अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागामध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारताने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. चिनी लष्करातील २०० सैनिकांनी तिबेटच्या सीमेजवळून भारतीय सिमेमध्ये घुसखोरी केली आणि या ठिकाणी सैनिक तैनात नसणाऱ्या बंकर्सची नासधूस केल्याची माहिती सरकारी सुत्रांनी न्यूज १८ ला दिली आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या बूम ला आणि यांग्त्से प्रदेशामध्ये मागील आठवड्यामध्ये हा घुसखोरीचा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी लष्कराच्या गस्त घालणाऱ्या पथकाने भारतीय प्रदेशामध्ये प्रवेश केला. त्यानंतर भारतानेही त्यांना चोख उत्तर देत चिनी तुकडीमधील काही सैनिकांना तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलं. “हे प्रकरणनंतर स्थानिक लष्करी कमांडर्स स्तरावर सोडवण्यात आलं. चिनी सैनिकांना सोडून देण्यात आलं,” असं सुत्रांनी स्पष्ट केलं आहे.

या घटनाक्रमासंदर्भात लष्कराकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. मात्र संरक्षणासंदर्भातील जबाबदारी असणाऱ्या सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये भारतीय संरक्षण दलांना नुकसान झालेलं नसल्याचं म्हटलं आहे.

“भारत आणि चीनमधील सीमांची ठोस निश्चिती करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात वेगवेगळे दावे केले जातात. दोन्ही देशांमधील समझोते आणि इतर करारांनुसार या ठिकाणी शांतता ठेवण्याला प्राधान्य असलं तरी घुसखोरीबद्दल दोन्ही देशांमध्ये सीमा निश्चिती नसल्याने मतमतांतरे आहेत,” असं सुत्रांनी म्हटलं आहे. सध्या दोन्ही बाजूच्या सैन्यांकडून गस्त घातली जात आहे.

“दोन्ही बाजूच्या गस्त घालणाऱ्या तुकड्या जेव्हा प्रत्यक्षात भेटतात तेव्हा ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे ते वागतात,” असं सुत्र म्हणाले. या प्रदेशामध्ये चीनने अशाप्रकारे घुसखोरी करणं काही नवीन राहिलेलं नाही. २०१६ साली २०० हून अधिक चिनी सैनिक भारतीय सीमेमध्ये घुसले होते. मात्र काही तासांनंतर ते परत आपल्या प्रदेशात गेले. २०११ साली भारतीय सीमेमध्ये असणारी २५० मीटर उंच भींत सर करण्याचा प्रयत्न चिनी सैनिकांनी केलेला तेव्हा सुद्धा भारताने आक्षेप नोंदवलेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तवांग महत्वाचा का?
तवांग हा प्रदेश नेहमीच भारत आणि चीनमधील संघर्षाचा महत्वाचा मुद्दा राहिला आहे. १९६२ मध्ये चीनने या प्रदेशावर ताबा मिळवला होता. त्यावेळी काही दिवस ताबा मिळवल्यानंतर त्यांनी हा भाग तिबेटचा हिस्सा असल्याचं म्हटलं होतं. तर तिबेटने अरुणाचल प्रदेशचा भाग हा दक्षिण तिबेट असल्याचं म्हटलं होतं. तवांगचा प्रांताला ऐतिहासिक महत्व असून सहावे दलाई लामा यांचं ते जन्मस्थान आहे. तसेच तिबेटीयन बौद्धांसाठी पवित्र मानली जाणारं ल्हासा सुद्धा याच प्रांतात आहे. तवांगमधून ब्रम्हपुत्रा नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रदेशात सहज जाता येतं. तसेच या प्रदेशातून आसाममधील तेझपूरला जाणारा मार्ग अगदीच जवळ आहे.