What is Bhargavastra : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील निर्माण झालेला तणाव सध्या काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या तणावादरम्यान भारताने पाकिस्तानकडून होणारे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. भारत आपली सुरक्षा कायम मजबूत करत असल्याचं पाहायला मिळतं. आता भारताला ‘भार्गवास्त्र’ ही एक नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळाली आहे. ‘भार्गवास्त्र’ची ओडिशामध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

‘भार्गवास्त्र’ ही ड्रोन प्रणाली एकाच वेळी अनेक ड्रोनवर मारा करण्यास सक्षम असल्याचं सांगितंल जातं. भारताने भार्गवास्त्र नावाच्या नवीन आणि कमी किमतीच्या काउंटर ड्रोन प्रणालीची आज (१४ मे) यशस्वी चाचणी घेतली असून ही ड्रोन प्रणाली वाढत्या ड्रोनच्या धोक्याला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

ओडिशाच्या गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये या प्रणालीच्या सूक्ष्म रॉकेटची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. भार्गवास्त्र हे २.५ किमी अंतरावर लहान आणि येणाऱ्या ड्रोनला शोधून नष्ट करण्याची क्षमता यामध्ये आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या रॉकेटच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यावेळी आर्मी एअर डिफेन्सच्या वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

तसेच यावेळी दोन चाचण्यांमध्ये प्रत्येकी एक रॉकेट डागण्यात आले. एक चाचणी दोन सेकंदात सॅल्व्हो मोडमध्ये दोन रॉकेट डागण्यात आली. चारही रॉकेट्सनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. दरम्यान, समुद्र सपाटीपासून ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाइन केलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांसाठी महत्वाची ठरणारी आहे.

नेमकं काय आहे ‘भार्गवास्त्र’?

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने ‘भार्गवस्त्र’ ही नवी काउंटर ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. ड्रोनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी ही प्रणाली महत्वाची भूमिका बजावणार आहे. या नव्या प्रणालीची चाचणी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांसमोर गोपाळपूर या ठिकाणी घेण्यात आली. या प्रणालीमध्ये बसवलेल्या सर्व सूक्ष्म रॉकेट्सनी निश्चित केलेल्या लक्ष्यांवर मारा केला आणि ही मोहिम यशस्वी झाली.