भारताने शुक्रवारी काबूलमधील आपल्या तांत्रिक मिशनला दूतावासाचा दर्जा देण्याची घोषणा केली आणि अफगाणिस्तानमधील विकासकामे पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही भारताच्या सुरक्षा चिंतांबद्दल संवेदनशीलता दाखवल्याबद्दल अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीचे कौतुक केले. सहा दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी नवी दिल्ली येथे आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी व्यापक चर्चेदरम्यान जयशंकर यांनी ही घोषणा केली.
ऑगस्ट २०२१मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर भारताने काबूलमधील आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना माघारी बोलावले होते. जून २०२२ मध्ये, भारताने ‘तांत्रिक पथक’ तैनात करून अफगाणिस्तानच्या राजधानीत आपली राजनैतिक उपस्थिती पुन्हा स्थापित केली होती.
बैठकीत जयशंकर यांनी सीमापार दहशतवाद दोन्ही देशांसाठी एक समान धोका असल्याचे सांगितले आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानला समन्वित प्रयत्न करावे लागतील असे सांगितले. भारत आणि अफगाणिस्तान दोघांचीही विकास आणि समृद्धीसाठी सामायिक वचनबद्धता असल्याचेदेखील ते म्हणाले. भारत अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे जयशंकर म्हणाले.
काबूल भारतात राजदूत पाठवणार : मुत्ताकी
द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या टप्प्याटप्प्याने प्रयत्नांचा एक भाग म्हणून काबूल भारतात राजदूत पाठविणार असल्याची घोषणा अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी शुक्रवारी केली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी व्यापक चर्चेनंतर काही तासांनी झालेल्या पत्रकार परिषदेत मुत्ताकी यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
अफगाणिस्तानच्या भूमीवर अफगाण हितसंबंधांना हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही कृतीला परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी नवी दिल्लीला दिले.
यापूर्वी भारतातील अफगाण मिशनमधील बहुतेक अधिकाऱ्यांची नियुक्ती मागील अशरफ घनी सरकारने केली होती. दरम्यान, भारताने अद्याप तालिबानला मान्यता दिलेली नाही.