भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालातून समोर आले आहे. बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंड आणि डेन्मार्कमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी आहे.

जागतिक आर्थिक मंच आणि इतर संघटनांकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेने जगातील सर्वाधिक पारदर्शक आणि कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशांची यादी तयार केली आहे. ही यादी तयार करताना देशांमधील सार्वजनिक जीवनात नेमका किती भ्रष्टाचार आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. भ्रष्टाचार मोजताना ० ते १०० असे गुण देण्यात आले आहेत. शून्य गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार आणि शंभर गुण म्हणजे सर्वाधिक पारदर्शकता असे या गुणांचे स्वरुप आहे.

भारत, चीन आणि ब्राझीलला लाचविरोधी संघटनेने ४० गुण दिले आहेत. त्यामुळे भारतसाह चीन आणि ब्राझीलचा समावेश मध्यम भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या गटात झाला आहे. २०१५ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात भारताला ३८ गुण मिळाले होते. यंदा त्यामध्ये २ गुणांची वाढ झाली आहे. न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या दोन्ही देशांनी प्रत्येकी ९० गुण मिळवत यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंड, डेन्मार्क पाठोपाठ फिनलंड, स्वीडन, स्विझर्लंड, नॉर्वे, सिंगापूर, नेदरलँड आणि कॅनडाचा क्रमांक लागतो. या देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेचा अहवाल सांगतो.

सोमालिया देशातील सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. याशिवाय सार्वजनिक संस्थांमधील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये सीरिया, दक्षिण सुदान, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान आणि इराकचा समावेश आहे.

एकाही देशाला भ्रष्टाचार पूर्णपणे मोडून काढता आलेला नाही, हे लाचविरोधी संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यासोबतच जवळपास दोन तृतीयांश देशांना ५० पेक्षा कमी गुणांची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे जगभरात भ्रष्टाचार मोठी समस्या असल्याचे या अहवालाने अधोरेखित केले आहे. या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या १७६ देशांची स्थिती विचारात घेता भ्रष्टाचाराची जागतिक सरासरी ४३ इतकी आहे. त्यामुळे भारतातील भ्रष्टाचार हा जागतिक सरासरीपेक्षा जास्त असल्याचे हा अहवाल सांगतो.