भारताने पाकिस्तान आणि चीनला दिल्लीतील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आमंत्रण दिलंय. ही बैठक अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर होणार आहे. यासाठी भारताने चीन, पाकिस्तानसह रशियालाही आमंत्रण दिलंय. या बैठकीत या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी भारताने १० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अशा २ तारखा सुचवल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव असतानाही दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर होणाऱ्या या बैठकीचं निमंत्रण पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांना देण्यात आलंय. यामागे अफगाणिस्तानवरील तालिबानची सत्ता आणि त्यामुळे तयार झालेले मानवहक्क उल्लंघन आणि सरक्षाविषयक प्रश्न यावर उत्तर शोधणं असे उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.
भारतातील बैठकीआधी रशियातही महत्त्वाची बैठक, तालिबान सरकारचीही उपस्थिती
दुसरीकडे भारत रशियाने मॉस्कोमध्ये अफगाणिस्तानच्याच मुद्द्यावर आयोजित केलेल्या बैठकीलाही हजेरी लावणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. ही बैठक २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि तालिबानची पहिली चर्चा ३१ ऑगस्ट रोजी दोहा येथे झाली. तेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार स्थापन झालेलं नव्हतं. आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन केल्यानंतर भारत आणि तालिबान सरकार पहिल्यांदाच रशियात चर्चा करणार आहेत.
हेही वाचा : “हल्ले करण्याचा काळ आता संपलाय”, तालिबाननं दिला ‘नाटो’ला इशारा, म्हणे “अशा समस्यांवर…!”
भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “भारताने अफगाणिस्तानला माणुसकीच्या आधारावर याआधीही मदत देऊ केलीय आणि यापुढेही देऊ करेल. कारण भारताचं अफगाणिस्तानसोबतचं धोरण हे अफगाणिस्तानमधील नागरिकांसोबतच्या मैत्रीशी संबंधित आहे.”