एक्स्प्रेस वृत्त, नवी दिल्ली
इजिप्तच्या शर्म-एल शेख येथे सोमवारी होणाऱ्या ‘गाझा शांतता शिखर परिषदे’त परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले. मात्र परराष्ट्र राज्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
इजिप्तच्या अध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘शांतता शिखर परिषद सोमवारी शर्म अल शेख येथे होणार आहे. या शिखर परिषदेचे अध्यक्ष अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष सिसी असतील. या परिषदेला २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गाझा पट्ट्यातील युद्ध संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट या परिषदेचे आहे. पश्चिम आशियात दीर्घ काळ शांतता राहण्यासाठी परिषदेत मंथन होईल. प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरतेच्या नव्या संधी या परिषदेमुळे खुल्या होतील.’
‘व्हाइट हाउस’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी सकाळी प्रथम इस्रायलमध्ये येणार आहेत. ते ओलिसांच्या कुटुंबीयांना भेटून इस्रायलच्या संसदेत भाषण करतील. ट्रम्प त्यानंतर इजिप्त येथे जातील आणि शांततेसाठीच्या शिखर परिषदेला उपस्थित राहतील. इजिप्तचे अध्यक्ष आब्देल फत्ताह अल सिसी यांच्यासह ट्रम्प हे परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविणार आहेत.’
ओलिसांच्या, युद्धकैद्यांच्या सुटकेची तयारी
कैरो : हमासने ओलीस ठेवलेले इस्रायलमधील नागरिक आणि इस्रायलच्या कैदेत असलेले पॅलेस्टिनी युद्धकैद्यांच्या सुटकेचीही तयारी रविवारी सुरू होती. सोमवारपासून ओलिसांच्या स्वागतासाठी इस्रायलमधील त्यांचे आप्तस्वकीय प्रतीक्षा करीत आहेत, असे वक्तव्य इस्रायलमधील अधिकारी गॅल हिर्श्च यांनी केले. जिवंत ओलिसांना रुग्णालयात पाठविले जाईल, तर मृतांना फॉरेन्सिक विभागात पाठविण्यात येणार आहे.
गाझामध्ये मदत पुरविण्यासाठीच्या तयारीला वेग
इस्रायल-हमासमध्ये युद्धविरामावर संमती झाल्यानंतर गाझा पट्टीत मदत पुरविण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या युद्धविरामानंतर दोन वर्षांपासूनचे युद्ध संपुष्टात येऊन शांतताकाळाला सुरुवात होण्याची आशा सारे बाळगून आहेत. गाझा पट्टीत मानवी मदतीवर देखरेख करणाऱ्या इस्रायली सैनिकांनी सांगितले, की करारानुसार, गाझा पट्टीत मदत घेऊन येणाऱ्या ट्रकची संख्या रविवारी वाढलेली असेल. सुमारे ६०० ट्रक मदत गाझा पट्टीत रविवारी येईल. इजिप्तमधून गाझाला ४०० ट्रकमधून मदत पुरविण्यात आली आहे. इस्रायलचे सैनिक प्रत्येक ट्रक तपासून पुढे पाठवीत आहेत.
पॅलेस्टिनी परतण्यास सुरुवात
दरम्यान, इस्रायलचे सैनिक माघारी गेल्यानंतर त्या ठिकाणी परतण्यास पॅलेस्टिनींनी सुरुवात केली आहे. अनेकांना घरांच्या जागी उद्ध्वस्त झालेले ढिगारेच दिसत आहेत.