Asim Munir On India : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला. मात्र, तरीही पाकिस्तानमधील काही नेत्यांकडून भारताविरोधात गरळ ओकणे सुरूच आहे. यातच पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताला पुन्हा एकदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. तसेच यावेळी बोलताना असीम मुनीर यांनी केलेल्या आणखी एका विधानाची मोठी चर्चा रंगली आहे.

असीम मुनीर यांनी भारताबाबत बोलताना भारताची तुलना चमकदार मर्सिडीज कारशी केली आहे. तसेच पाकिस्तानची तुलना ‘डंप ट्रक’ अशी केली आहे. तसेच या दोन्ही वाहनांची धडक झाली तर कोणाचं नुकसान होईल? असा सवाल असीम मुनीर यांनी केला. मात्र, स्वत:च्या देशाची तुलना ‘डंप ट्रक’ अशी केल्याने आणि भारताची तुलना चमकदार मर्सिडीज अशी केल्यामुळे असीम मुनीर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील अनेक युजर्संनी असीम मुनीर यांना ट्रोल केलं आहे. एका युजर्सने म्हटलं की, “असीम मुनीर यांनी स्वतःच्या देशाचं वाईट पद्धतीने चित्रण केलं. मात्र, त्यांच्या विधानातील एकमेव सत्य म्हणजे भारत मर्सिडीज आहे आणि त्यांचा देश ‘डंप ट्रक’ आहे. बाकी सर्व काही भ्रम आहे”, असं एका एक्स वापरकर्त्याने म्हटलं. तर दुसऱ्या एका युजर्सने मर्सिडीजचा फोटो पोस्ट करत म्हटलं की, “भारत हा क्षेपणास्त्रांनी भरलेला देश आहे, जो घातक आहे. तो तुम्हाला उद्ध्वस्त करेल.”

असीम मुनीर यांची भारताला धमकी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा धमकी दिली. असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी म्हटलं की, जर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले तर ते अणुयुद्ध करतील. पण ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भारत आता अणुयुद्धाच्या कोणत्याही धमक्यांना ऐकणार नाही आणि कोणत्याही दहशतवादी घटनेला युद्धाचे कृत्य मानले जाईल. द प्रिंटच्या वृत्तानुसार, असीम मुनीर अमेरिकेत एका चहापान कार्यक्रमात उपस्थित होते, जिथे त्यांनी भारताला धमकी दिली. असीम मुनीर म्हणाले की, सिंधू जल करार स्थगित करून भारताने २५ कोटी लोकांना उपासमारीच्या धोक्यात आणले आहे. ते म्हणाले की, “आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधले जाईल, तेव्हा आम्ही ते १० क्षेपणास्त्रांनी उडवून देऊ”

जूननंतर दुसऱ्यांदा अमेरिका दौरा

यापूर्वी मुनीर यांनी जूनमध्ये पाच दिवसांचा अमेरिका दौरा केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. जूनमधील दौऱ्यात मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एका खाजगी स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या भेटीमुळे अमेरिका-पाकिस्तान सहकार्य वाढविण्याच्या घोषणा झाल्या, ज्यामध्ये तेल कराराचाही समावेश आहे.