जगभरात सर्वाधिक सुखी मुस्लीम हे भारतात आढळतील, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कालच म्हटले होते. त्यानंतर आज (सोमवार) सुफी प्रतिनिधीमंडळाचे अध्यक्ष नसिरुद्दीन चिश्ती यानी देखील भारत मुस्लिमांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे म्हणत एकप्रकारे सरसंघचालकांच्या वक्तव्यास दुजोरा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर येथील नागिराकांची भेट घेण्यासाठी व काश्मीर खोऱ्यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी, अजमेर शरीफ दर्गाचे नसीरुद्दीन चिश्ती यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय सुफी सज्जादान परिषदेचे प्रतिनिधीमंडळ जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत, भारत मुसलमानांसाठी एक चांगला देश असल्याचे म्हटले आहे.

यावेळी चिश्ती यांनी हे देखील सांगितले की, आम्ही स्थानिक लोकांना भेटलो. पण एकानेही मानवाधिकाराच्या उल्लंघनाबाबत भाष्य केले नाही. पाकिस्तानचा काश्मीरबाबतचा प्रचार खोटा आहे. हो, फोनसारख्या मुलभूत गोष्टींवर तिथे बंदी आहे. परंतु, मोठा निर्णय घेतल्यामुळे अशा पद्धतीचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

एवढेच नाहीतर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून जिहादच्या नावाखाली भडकवले जात असल्याचा आरोप करत, ही शरमेची बाब असल्याचेही म्हटले. तसेच, जर पाकिस्तानला हौस असेल, तर त्यांनी चीन किंवा पॅलेस्टाईन येथे जाऊन लढायला हवे, आम्हाला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. असेही सांगितले.