अजमेर दर्गाच्या प्रमुख झैनुल अबदिन अली खान यांनी तवांगच्या यांगत्से सीमाभागात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या झटापटीसंदर्भात मतप्रदर्शन केलं आहे. मंगळवारी केलेल्या एका विधानामध्ये खान यांनी, “भारताने चीनला बालाकोटप्रमाणे धडा शिकवावा,” असं म्हटलं आहे. गेल्या शुक्रवारी (९ डिसेंबर) झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर देशभरामधून प्रतिक्रिया उमटत असतानाच खान यांनी नेहमीचा हा त्रास टाळण्यासाठी थेट पाकिस्तानमधील बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्लाप्रमाणे चीनवरही हल्ला करण्याचा सल्ला दिला.

“चीनच्या रोजच्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर…”

“चीन दररोज भारतीय सीमा ओलांडून येण्याचा प्रयत्न करते. भारतीय सैन्याशी त्यांचा संघर्ष झाल्याच्या बातम्याही समोर आल्यात. आम्हाला अभिमान आहे की आमच्या सैनिकांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. रोजच्या कुरापती होत असतील तर भारताने चीनला बालाकोटप्रमाणे एखादा धडा शिकवावा,” असं खान यांनी म्हटलं आहे.

“…तर हा नवीन भारत आहे हे लक्षात ठेवा”

भारत हा कायमच शेजराच्या देशांबरोबर शांतता आणि चांगले संबंध रहावे यासाठी प्रयत्नशील असतो. मात्र त्याचा अर्थ भारत कमजोर आहे असा घेतला जाऊ नये, असंही खान यांनी म्हटलं. “चीन असो किंवा इतर कोणताही देश, सीमांचं संरक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. उदाहरणार्थ बालाकोट. आपल्या कुरापती चीनने थांबवल्या पाहिजे. तसं होणार नसेल तर हा नवीन भारत आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे,” असं म्हणत खान यांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला.

बालाकोट हवाई हल्ला नेमका कसा केलेला?

फेब्रुवारी २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४१ जवान शहीद झाले होते. एअर स्ट्राइक करत भारताने या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवला. पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

नक्की वाचा >> अरुणाचलमध्ये भारत-चीन लष्करी संघर्ष: “मोदींनी स्वत:ची प्रतिमा वाचवण्यासाठी देशाला धोक्यात टाकलं, LAC पासून १५ ते १८ किमी आतपर्यंत…”

भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक

‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकाऱ्याने दुजोरा दिला असला तरी त्याबाबतचा तपशील देण्यास मात्र त्याने नकार दिला. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकाऱ्याने केला. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भारतीय जवानांची ६०० चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले.

चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ

चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमधील पूर्व लडाखमध्ये २०२०मध्ये झालेल्या चकमकीपूर्वी, चिनी तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून खूप दूर होते. परंतु त्यानंतर मात्र चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ सरकण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत चीनने पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पूर्व आणि मध्य क्षेत्रांमध्ये चीनच्या हालचाली वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी याआधी सांगितले होते. भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पश्चिम (लडाख), मध्य (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड), सिक्कीम आणि पूर्व (अरुणाचल प्रदेश) क्षेत्रात विभागली गेली आहे.

जवानांवर गुवाहाटीत उपचार?

चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाल्याचा दावा एका लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. मात्र या चकमकीत भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर गुवाहाटीत उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चकमक झाली तेव्हा ६०० चिनी सैनिक होते, अशीही माहिती आहे.

गलवान नंतरची पहिलीच घटना

लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. गलवान चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत लष्करी पातळीवर द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.

तवांग क्षेत्रातील सज्जता..

चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन तवांग सीमा क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजिक (एलएसी) शस्त्रास्त्र सज्जता आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दळणवळणाच्या अद्ययावतीकरणासह अप्पर दिबांग खोऱ्यात चिनी सैनिकांवर पाळतही ठेवण्यात येते.