पीटीआय, संयुक्त राष्ट्रे : युक्रेनमध्ये रशियाने घेतलेले सार्वमत आणि चार प्रांतांचे केलेले एकतर्फी विलीनीकरण याविरोधात संयुक्त राष्ट्र महासभेत मांडण्यात आलेल्या ठरावावर भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. हा ठराव १४३ विरुद्ध ५ अशा मोठय़ा मताधिक्याने स्वीकारण्यात आला.

‘युक्रेनचे सार्वभौमत्व : संयुक्त राष्ट्रांच्या धोरणांचे रक्षण’ या ठरावावर तटस्थ राहताना भारताने स्पष्ट केले की, ‘‘आतापर्यंतच्या भूमिकेला सुसंगत आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. तणाव तातडीने कमी करून चर्चेच्या मार्गाने प्रश्न सोडवावा, हीच भारताची भूमिका आहे.’’ भारतासह चीन, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, थायलंड, व्हिएतनाम आदी ३५ देश तटस्थ राहिले. तर रशिया, बेलारूस, उत्तर कोरिया, सीरिया आणि निकारगुआ या देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ठराव स्वीकारला जाताच महासभेमध्ये टाळय़ांचा कडकडाट झाला.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी रुचिरा कंभोज यांनी सांगितले की, ‘‘शांतता हवी असेल तर चर्चा आणि मुत्सद्देगिरीचे सर्व मार्ग खुले ठेवले पाहिजेत. त्यामुळे तातडीने शस्त्रसंधी होऊन चर्चेतून लवकर तोडगा निघावा, अशी आमची अपेक्षा आहे. तणाव कमी करण्याच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबाच असेल. मात्र आजच्या ठरावात काही महत्त्वाच्या विषयांचा उल्लेख नव्हता. या युद्धामुळे विकसनशील देशांमध्ये अन्नधान्य, इंधन, खतांची टंचाई यांसारख्या समस्या आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळेल, अशा कोणत्याही कृतीला विरोध असल्यामुळे भारताने ठरावावर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

ठरावात काय?

२३ ते २७ सप्टेंबर दरम्यान रशियाने डोनेत्स्क, खेरसन, लुहान्स्क आणि झापोरीझ्झिया प्रांतात घेतलेले सार्वमत ही नियमबाह्य कृती आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या चार प्रांतांच्या विलीनीकरणाला आणि युक्रेनच्या सीमांमध्ये केल्या गेलेल्या बदलास कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार नाही.

अणुयुद्धावर ‘नाटो’ची खलबते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रसेल्स : रशिया-युक्रेनमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘उत्तर अटलांटिक करार संघटने’ने (नाटो) संभाव्य अणुयुद्धाबाबत चर्चा सुरू केली आहे. येथील संघटनेच्या मुख्यालयात ‘नाटो’च्या अण्वस्त्र नियोजन गटाची बैठक झाली. या वेळी रशियाने वाढवलेले क्षेपणास्त्र हल्ले, पुतिन यांनी दिलेली धमकी आणि रशियाकडून अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराबाबत चर्चा झाली. रशियाच्या धमक्यांना उत्तर म्हणून पुढल्या आठवडय़ात अण्वस्त्र सराव करण्याचा निर्णय घेण्यात आला. रशियाच्या हालचालींवर ‘नाटो’ लक्ष ठेवून असली तरी अद्याप पुतिन यांच्याकडून अण्वस्त्र हल्ल्याबाबत कोणतीही तयारी दिसत नसल्याची माहिती आहे. मात्र नजीकच्या काळात रशियादेखील अण्वस्त्र सराव करणार असल्यामुळे अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे.