देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी बोलसोनारो यांनी केली आहे. मात्र भारताने करोनासंदर्भातील जे धोरण तयार केलं आहे त्यानुसार सर्वात आधी भारत आपल्या शेजरच्या देशांना करोनाची लस देणार आहे. त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये करोनाची लस पाठवली जाणार आहे.

या देशांना प्राधान्य

दिवसोंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारताने करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांनी भारताकडे करोनाच्या लसीची मागणी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत इतर देशांना करोनाच्या लसीचा पुरवठा करताना शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामुळेच बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लसींचा पुरवठा करणार असल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.

भारताने स्पष्ट केली भूमिका

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारत सुरुवातीपासूनच करोना विषाणूच्याविरोधातील युद्धात जगभरातील देशांसोबत खांद्याला खांदा लावून लढत आहे. या लढाईमध्ये सर्व देशांशी सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य असल्याची भारताची भूमिका आहे. या करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताला जास्तीत जास्त देशांची मदत करता यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेन्का कोविड-१९ लस आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला आपत्कालीन वापरसाठी भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

भारत होणार लसींचा पुरवठा करणारा देश

भारतीय लसींचा दर्जा, गुणवत्ता आणि परिणामकारकता पाहता जगभरातून या लसींना मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच या पूर्णपणे मेड इन इंडिया लसींचे जगभरात वितरण करण्यासाठी भारत सज्ज झाला असून भारतातील लसीकरणाच्या पहिल्या काही टप्प्यांनंतर या लसींच्या निर्यातील संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच भारत हा करोना लसीकरणामध्ये जागतिक केंद्र होण्याची शक्यता आहे.

चीनकडूनही कौतुकाचे बोल

भारतीय बनावटीच्या करोना लसींचे चीननेही कौतुक केलं आहे. दक्षि्ण आशियातील आमच्या शेजराच्या देशानी तयार केलेली करोना लस ही गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही लसीपेक्षा कमी नाहीय, असं चीनने म्हटलं आहे. चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखामध्ये भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या करोनाच्या लसी या चीनच्या करोना लसी इतक्याच प्रभावी असल्याचे म्हटले आहे. संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारताच्या करोना लसी या उत्तम असल्याचेही या लेखात म्हटलं आहे.