स्वातंत्र्य दिन जवळ येत असतानाच भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमालीचा वाढत आहे. पाकिस्तानने सोमवारी तीन वेळा भारतीय हद्दीत जोरदार गोळीबार केला असून उभय देशांतील शस्त्रसंधीचा भंग करण्याचा हा गेल्या तीन दिवसांतला सातवा प्रकार आहे. त्याचवेळी  भारताकडूनच शस्त्रसंधीचा वारंवार भंग होत असल्याचा कांगावा करीत पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत सैन्याची मोठय़ा प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारताच्या राजदूतांना बोलावून घेऊन या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबद्दल पाकिस्तानने निषेध नोंदविला आहे.
सीमेवर तणाव वाढत असतानाच दोन्ही देशांतील राजकीय आसमंतही तापत चालला आहे. पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या गोळीबारास तेवढेच ठोस प्रत्युत्तर द्या, असे लष्करप्रमुखांनीही बजावले असतानाच सीमेवर परिस्थितीनुरूप कारवाई करण्याची सैन्यास पूर्ण मोकळीक आहे, असे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनीही जाहीर केले आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान सीमेवरील आपले सर्व सैन्य हलवून ते भारतालगतच्या सीमेवर आणावे, अशी मागणी पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे. या आठवडय़ातच पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक होत असून त्यात लष्कराच्या मागणीबाबत निर्णय केला जाणार आहे. भारतातील आपल्या दूतावासातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना माघारी बोलाविण्याचा विचार पाकिस्तान करीत असल्याचे वृत्त ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे. पाकिस्तानने सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्तांना पाचारण केले आणि २००३ मध्ये झालेल्या शस्त्रसंधी कराराचा भारताकडून भंग सुरू असल्याबद्दल खडसावले, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे नमूद केले आहे. भारताच्या गोळीबारात रावळकोटमधील निरपराध नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. प्रत्यक्षात पाकिस्ताननेच सोमवारी पहाटे एक वाजून पन्नास मिनिटांपासून रात्री साडेनऊपर्यंत तीन वेळा भारतीय सरहद्दीतील लष्करी ठाण्यांच्या दिशेने गोळीबार केला, असे परराष्ट्र प्रवक्त्याने सोमवारी सांगितले.

जमवाजमव
विश्वसनीय सूत्रांनुसार पाकिस्तानने सियालकोट आणि कासुर या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत आधीच मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. लाहोरमध्ये मोठय़ा प्रमाणात दारुगोळ्याचा साठा आणला गेला आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी मात्र अशा मोर्चेबांधणीला दुजोरा दिलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतविरोधी ठराव
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधिमंडळात सोमवारी भारतविरोधी ठराव संमत करण्यात आला. भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याचे या ठरावात म्हटले आहे.
मून पाकिस्तानात : भारत- पाकिस्तानने काश्मीर प्रश्न अग्रक्रमाने सोडवावा, असे आवाहन करीत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून हे इस्लामाबादला येत आहेत.
सूचक विधान : भारताला ‘सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र’ हा दर्जा देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, भारतासोबतचे संबंध सुधारण्याची सध्या गरज आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानचे अर्थमंत्री इसाक दार यांनी सोमवारी केले.