India Pakistan Conflict timeline from Pahalgam terror attack to Ceasefire : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला होता. यादमरम्यान दोन्ही देशांकडून एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ले केले गेले. अखेर शुक्रवारी (१० मे) दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाबद्दल सहमती झाली. भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्यानंतर या शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली आणि तो शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपासून लागू करण्यात आला. यानंतर चार दिवसांपासून सीमेवर सुरू असलेले ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले आणि गोळीबार थांबवण्यात आला.

२२ एप्रिल : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला

दक्षिण काश्मीरच्या पहलगामजवळ बैसरन येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान २५ पर्यटक आणि एका स्थानिक पोनी ऑपरेटरचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने स्वीकारली होती. या वर्षात जम्मू काश्मीरमध्ये झालेला हा पहिलाच प्राणघातक हल्ला होता.

२३ एप्रिल : भारताने आक्रमक भूमिका घेतली

या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत संबंध भारताने पाकिस्तानबरोबरचा १९६० चा सिंधू जल करार स्थगित केला. याबरोबरच राजनैतिक संबंध कमी करत दिल्लीतील अर्धे पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी आणि वरिष्ठ संरक्षण अधिकार्‍यांना देशातून जाण्यास सांगितले.

यासह भारताना पाकिस्तानी नागरिकांना सार्क अंतर्गत दिलेले सर्व व्हिसा रद्द केले, तसेच त्यांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देखील दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाघा-अटारी सीमा देखील बंद करण्यात आली. यानंतर पाकिस्तानने देखील भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांची हवाई हद्द बंद केली आणि भारतीय नागरिकांचे व्हिसा रद्द केले.

एप्रिल २५ : नियंत्रण रेषेवर गोळीबार

जम्मू आणि काश्मीर येथे नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. वरिष्ठ कमांडर्समध्ये झालेल्या बैठकीनंतर काही आठवड्यातच हा गोळीबार करण्यात आला.

२६ एप्रिल : इराणकडून मध्यस्थीची ऑफर, अमेरिकेकडून शांततेचे आवाहन

इराणने भारत आणि पाकिस्तान या दोन देशात चर्चेसाठी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली. तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान हे त्यांच्यातील वाद सोडवतील असे म्हटले, यावेळी त्यांनी तणाव वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा देखील दिला.

३० एप्रिल : सलग पाचव्या रात्रीही गोळीबार सुरूच

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरून कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर जिल्ह्यांना लक्ष्य करत गोळीबार सुरूच ठेवला. यावेळी भारतीय लष्कराचे या गोळीबाराला चोख आणि जोरदार प्रत्युत्तर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांना पहलगाम येथे हल्ला करणाऱ्यांना शिक्ष मिळाली पाहिजे असे सांगितले. यावेळी रुबियो यांनी भारताला तणाव कमी करण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.

३ मे : भारताने टपाल आणि व्यापारी मार्ग बंद केले

भारताने पाकिस्तानातून हवाई तसेच जमीनी मार्गाणी येणारे टपाल आणि पार्सल या दोन्हींची देवाणघेवाण बंद केली. तसेच इस्लामाबादवर दबाव वाढवण्यासाठी पाकिस्तानातून होणारी सर्व प्रकारची आयात आणि वस्तूंची वाहतूक बंद करण्यात आली.

७ मे : भारताकडून पाकिस्तान आणि पीओकेमध्ये एअर स्ट्राईक

भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यानंचर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये १२ नागरिकांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले.

मे ८ : ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला

पाकिस्तानने क्षेपणास्त्र आणि ड्रोनने १५ भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, यानंतर भारतीय सेनेने लाहोर येथील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली.

९ मे: आयपीएल स्थगित

पाकिस्तानकडून सलग दुसर्‍या रात्री बारामुल्ला ते भुज पर्यंत २६ ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलांच्या प्रमुखांबरोबर सुरक्षा बैठक बोलावली. दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे १० : शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली

भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर एकमेकांवर हल्ले न करण्याबाबत एकमत झाले. शस्त्रविराम संध्याकाळी ५ पासून लागू करण्यात आला. १२ मे रोजी दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांमध्ये दुपारी १२ वाजता पुढील चर्चा होणार आहे.