Trump Tariff and Boeing Jets Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ वाढविण्याचा सपाटा लावला आहे. आधी २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर आठवड्याभरातच त्यांनी यात २५ टक्क्यांची आणखी वाढ केली. यानंतर व्यापार जगतात एकच खळबळ उडाली. यानंतर भारताने मात्र सावध भूमिका घेतल्याचे दिसले. आता भारताच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेकडून बोईंग जेट विमान खरेदीच्या ३.६ अब्ज डॉलर्सच्या कराराला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

२०२१ मध्ये सहा बोईंग पी-८आय सागरी गस्त विमानासाठींचा मूळ करार २.४२ अब्ज डॉलर्सला मंजूर करण्यात आला होता. मात्र महागाई, पुरवठा साखळीत आलेले व्यत्यय आणि ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कामुळे गेल्या काही वर्षात या करारात वाढ झाली.

फायनान्शियल एक्सप्रेसने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकल्पात जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाल्यामुळे करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर विमान खरेदीची किंमत वाढली.

बोईंग खरेदीचा खर्च भरमसाठ वाढल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने या खरेदीला स्थगिती दिली असून धोरणात्मक पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती, वेगाने बदलत असलेली भू-राजकीय परिस्थिती, स्वायत्तता यासारख्या घटकांचा परिणाम म्हणून करार स्थगित करण्यात आला आहे.

दरम्यान सदर कराराबद्दल किंवा त्याच्या स्थगितीबद्दल भारत सरकारकडून अद्यात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असेही फायनान्शियल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

५० टक्क्यांनी दर का वाढले?

विमानांच्या पुरवठा साखळीमध्ये भारतीय निर्यात किंवा भारताने निर्मित केलेल्या आयुधांचा वापर होतो. मात्र अमेरिकेने टॅरिफ लादल्यामुळे या वस्तू अमेरिकेत महाग होणार आहेत. त्याचा परिणाम असा की, बोईंगच्या अंतिम किमती वाढल्या आहेत. ज्याचा भार भारताला सहन करावा लागू शकतो.

टॅरिफ वाढीबाबत ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढीबाबत म्हटले की, जोपर्यंत भारतासोबतचा टॅरिफचा वाद मिटत नाही, तोपर्यंत व्यापार करारावर कोणतीही चर्चा होणार नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच लादलेल्या २५ टक्के टॅरिफ व्यतिरिक्त भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादला आहे. अशा प्रकारे, भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. आधीचा २५ टक्के टॅरिफ लागू झालेला आहे, तर उर्वरित २५ टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होईल.