वाराणसी : मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचलपाठोपाठ उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आदी राज्यांमधील जनजीवनही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. येथील दंतेवाडा, विजापूर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाने झोडपले. तर, उत्तर प्रदेशात वाराणसी येथे गंगा नदीचे पाणी घाटांवर गेल्याने येथील आरती, अंत्यसंस्कारावर परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबमधील पूरग्रस्त भागांत प्रशासनाच्या वतीने बचावकार्य केले जात आहे.

प्रयागराजमध्ये गंगेची पाणी पातळी गुरुवारी सकाळी ७०.२६२ मीटर इशारा चिन्ह ओलांडून ७०.९१ मीटरवर पोहोचली, ७१.२६२ मीटर ही या नदीची धोका पातळी आहे. पुराच्या पाण्याने दशाश्वमेध घाट, हरिश्चंद्र आणि मणिकर्णिका घाटही पाण्याखाली गेले. वाढती पाण्याची पातळी आणि पुराची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

छत्तीसगडमधील बस्तरमध्ये पुरामुळे आठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ९६ पशुधन मृत्युमुखी पडले आहेत, तसेच सुमारे ४९५ घरे आणि १६ छोट्या पुलांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील सुमारे दोन हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सतलज, बियास आणि रावी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पंजाबमधील शेती आणि गावांचा मोठा भाग पाण्याखाली गेला. पठाणकोट, गुरुदासपूर, फाजिल्का, कपूरथला, तरनतारन, फिरोजपूर, होशियारपूर आणि अमृतसर आदी जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील प्रकाशम बॅरेज येथे मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये पावसाचा जोर कमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गेले तीन-चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी काहीशी उसंत घेतली. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचा धोका कमी झाला. झेलम आणि इतर नद्यांमधील पाणी पातळीतही घट झाली आहे. बुधवारी ज्या भागात पाणी भरले होते तेथेही पाणी कमी होऊ लागले आहे. दरम्यान, ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत जम्मूच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात १७ जणांचा मृत्यू

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेकडो गावे पाण्याखाली गेल्याने किमान १७ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. सतलज, रावी आणि चिनाब नद्यांना आलेल्या पुरामुळे कोट्यवधी नागरिकांचे स्थलांतर, पायाभूत सुविधांचे नुकसान, लाखो एकर शेतीजमीन पाण्याखाली गेली आहे.