पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिपाक म्हणून जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित करावे या भारताच्या प्रयत्नात चीनने खोडा घातल्याचा मुद्दा भरत चीनपुढे मांडण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील चीनच्या या कृतीमुळे भारताची ‘निराशा’ झाली असून, पहिली संधी मिळताच भारत हा मुद्दा ‘राजकीय पातळीवर’ मांडेल, असे सूत्रांनी सांगितले. रशिया-भारत-चीन (आरआयसी) मंत्रिस्तरीय बैठकीला हजर राहण्यासाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज या आठवडाअखेर मॉस्कोला जात आहेत. यानिमित्ताने स्वराज यांची चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी भेट होणे अपेक्षित असून, तीत त्या मसूदचा मुद्दा उपस्थित करतील अशी शक्यता आहे.भारताने मांडलेला मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या ‘आवश्यकतांची पूर्तता करत नसल्याचे’ सांगून गेल्या आठवडय़ात चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या र्निबध समितीला अझहर याला दहशतवादी घोषित करण्यापासून रोखले होते.