India rank 85th in Henley Passport Index 2025 US passports rank drop : कोणत्याही देशांच्या नागरिकासाठी त्याचा पासपोर्ट हा एक महत्त्वाचा दस्तावेज असतो. कोणत्या देशाचा पासपोर्ट अधिक प्रभावी आणि कोणत्या देशाचे कमकुवत हे निश्चित करणारी एक यादी जाहीर केली जाते. या २०२५ च्या ‘हेन्ले पासपोर्ट इंडेक्स’ मध्ये भारताचा पासपोर्ट ८५ व्या क्रमांकावर घसरला आहे. आता भारतीय पासपोर्टधारकांना गेल्या वर्षीच्या ५९ देशांच्या तुलनेत आता फक्त ५७ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळणार आहे. दरम्यानएकेकाळी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून ओळखला जाणारा अमेरिकेचा पासपोर्ट गेल्या दोन दशकांत प्रथमच पहिल्या १० देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. आता अमेरिकेचा पासपोर्ट हा १२ व्या क्रमांकावर आहे.
हेन्ले पासपोर्ट इंडेक्स काय आहे?
हे एक प्रकारची जागतिक क्रमवारी आहे. ज्यामध्ये एखाद्या पासपोर्टमुळे नागरिकांना कितीपत प्रवासाचे स्वातंत्र्य मिळते, यानुसार देशांची क्रमवारी लावली जाते. हा इंडेक्स २००५ मध्ये ‘हेन्ले अँड पार्टनर्स व्हिसा रिस्ट्रिक्शन इंडेक्स’ म्हणून सुरू करण्यात आला आणि नंतर जानेवारी २०१८ मध्ये त्याचे नाव बदलून ‘हेन्ले पासपोर्ट इंडेक्स’ असे करण्यात आले.
सगळ्यात शक्तीशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे?
सिंगापूरचा पासपोर्ट १९३ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेशामुळे या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. यानंतर दक्षिण कोरिया आणि जपानचा क्रमांक लागतो. युरोपियन देश जसे की जर्मनी, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंड हे देश देखील नेहमीप्रमाणे टॉप १० मध्ये स्थान टिकवून आहेत.
भारताची घसरण
भारताचा पासपोर्ट हा २०२५ मध्ये ८५ व्या क्रमांकावर घसरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच स्थानांची घसरण झाली आहे. भारतीय पासपोर्टधारक आता ५७ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात, गेल्या वर्षीच्या हा आकडा ५९ इतका होता.
भारताचे स्थान या क्रमवारीत वर खाली होत आले आहे. २००६ मध्ये भारताची क्रमवारी सर्वोच्च ७१ व्या स्थानावर होती, तर २०२१ मध्ये ती घसरून सर्वात खाली ९० व्या स्थानावर गेली . २०२४ मध्ये भारताचा क्रमांक ८० वा होता.
सध्या भारतीय नागरिक १२ ठिकाणी व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात, ज्यात भूतान, इंडोनेशिया, मॉरिशस, नेपाळ, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांचा समावेश आहे. याबरोबरच भारतीय नागरिकांना २७ देशांमध्ये ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ मिळू शकतो. यात श्रीलंका, मालदीव, जॉर्डन आणि कतार तसेच बोलिव्हिया, कंबोडिया, इथिओपिया, मादागास्कर, मंगोलिया, मोझांबिक, म्यानमार, समोआ, टांझानिया आणि तिमोर-लेस्ते यांसारख्या देशांचा समावेश आहे.
भारताच्या शेजाऱ्यांची काय स्थिती?
या क्रमवारीत पाकिस्तानचे स्थान १०३ वे आहे, पाकिस्तानी पासपोर्ट असलेले नागरिक ३१ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात. बांगलादेशचा क्रमांक १०० वा असून ते ३८ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात, तर नेपाळ त्यांच्या मागे १०१ व्या क्रमांकावर आहे, नेपाळचा पासपोर्ट असलेली व्यक्ती ३६ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकते. भूतानचा पासपोर्ट ९२ व्या क्रमांकावर आहे आणि येथील नागरिकांना व्हिसाशिवाय ५० देशांमध्ये प्रवास करता येतो.
अमेरिकेचा पासपोर्ट कमकुवत
अमेरिकेच्या पासपोर्टची पत गेल्या काही वर्षात सातत्याने कमी होताना दिसत आहे. २०१४ मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला हा पासपोर्ट आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्थानावर घसरला आहे. अमेरिकेचे नागरिक सध्या १८० ठिकाणी व्हिसा-फ्री प्रवास करू शकतात, परंतु अमेरिका स्वतः मात्र केवळ ४६ देशांना व्हिसा-फ्री प्रवेश देते.
जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट
२०२५ च्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा पासपोर्ट हा जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट ठरला आहे. या पासपोर्टवर तेथील नागरिकांना फक्त २४ देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळतो. तर सिरीया २६ आणि इराक २९ देशांसह याच्या अगदी जवळ आहेत.