अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत जागतिक स्तरावर लशीकरणाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ९४ लाखांहून अधिक आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोनायोद्धय़ांचे लसीकरण करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत एकूण ९४ लाख, २२ हजार, २२८ लाभार्थ्यांना लशीची मात्रा टोचण्यात आली, त्यामध्ये ६१ लाख, ९६ हजार, ६४१ करोनायोद्धे (पहिली मात्रा), तीन लाख, ६९ हजार, १६७ करोनायोद्धे (दुसरी मात्रा) आणि २८ लाख, ६५ हजार, ४२० करोनायोद्धे (पहिली मात्रा) यांचा समावेश आहे.

पहिली मात्रा घेतल्यानंतर २८ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना १३ फेब्रुवारीपासून दुसरी मात्रा देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाच्या ३३ व्या दिवशी (१८ फेब्रुवारी) एकूण चार लाख, २२ हजार, ९९८ जणांना एकूण सात हजार, ९३२ दोन सत्रांमध्ये लसीची मात्रा देण्यात आली आहे.

देशात आणखी १२,८८१ जणांना करोनाची लागण

देशात गेल्या एक दिवसात आणखी १२ हजार ८८१ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी, नऊ लाख, ५० हजार २०१ वर पोहोचली आहे. तर एक कोटी, सहा लाख, ५६ हजार, ८४५ जण आतापर्यंत करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

करोनामुळे गेल्या २४ तासांत आणखी १०१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख, ५६ हजार, १४ वर पोहोचली आहे. मृत्युदर १.४२ टक्क्य़ांवर आला असून बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के इतके आहे. बाधितांची एकूण संख्या १.५ लाखांपेक्षा कमी आहे. देशात सध्या एक लाख, ३७ हजार, ३४२ उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या १.२५ टक्के इतके आहे. गेल्या एक दिवसात १०१ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ५१ हजार, ६३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.