भारत व पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र झाल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या प्रकारांचा भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर व व्यासपीठांवर निषेध करण्यात आला आहे. मात्र, तरीही पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया चालूच आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरीची समस्याही अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला भारताकडे सोपवण्याची मागणी पाकिस्ताननं फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या विधानाचा दाखला इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद भारतातील इतरही काही दहशतवादी कारवायांच्या प्रकरणात वाँटेड आहे. हाफीज सईद सध्या पाकिस्तानमध्ये असून त्याला भारताच्या स्वाधीन केलं जावं, अशी मागणी भारत सरकारने पाकिस्तानला केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भात शुक्रवारी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. “हाफीज सईदला भारताच्या स्वाधीन केलं जावं, अशी विनंती आम्ही पाकिस्तान सरकारला केली आहे. त्यासाठी संबंधित सर्व कागदपत्रंही आम्ही सुपूर्त केली आहेत”, असं अरिंदम बागची म्हणाले.

‘हाफिज सईदचे प्रत्यार्पण करा’ भारताची पाकिस्तानकडे मागणी; सईद कुख्यात दहशतवादी कसा झाला? वाचा सविस्तर…

पाकिस्तानचा नकार, पुढे काय होणार?

दरम्यान, भारत सरकारने केलेली मागणी पूर्ण करण्यास पाकिस्तानने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं पाकिस्तानमधील डॉन या संकेतस्थळाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “पाकिस्तानला भारत सरकारकडून आर्थिक घोटाळा प्रकरणात हाफीज सईदच्या प्रत्यार्पणासंदर्भात विनंती मिळाली आहे”, अशी प्रतिक्रिया मुमताज झारा बलूच यांनी दिली आहे. तसेच “ही बाब आपण ध्यानात घ्यायला हवी की भारत व पाकिस्तानमध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही करार अस्तित्वात नाही”, असंही मुमताज झारा बलूच यांनी नमूद केलं. त्यामुळे पाकिस्तानकडून भारताची मागणी अप्रत्यक्षरीत्या फेटाळल्याचंच बोललं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करार नसतानाही हे शक्य आहे?

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, असा करार अस्तित्वात नसला, तरीही दोन देशांमध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते, असं या क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे. हाफीज सईदला जुलै २०१९मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकानं अटक केली होती. हाफीज सईद व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात २३ एफआयआर पाकिस्तानमध्ये दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयाने सईदला एप्रिल २०२२ मध्ये ३३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.