पीटीआय, नवी दिल्ली : G20 Summit Delhi 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी द्विपक्षीय व्यापार आणि संरक्षण कराराला चालना देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्य आणि कल्याणासाठी भारत-सौदी अरेबिया यांच्यातील भागीदारीचे महत्त्व पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत अधोरेखित केले. सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की, दोन्ही देश बदलत्या काळानुसार आपल्यातील द्विपक्षीय संबंधांना नवे आयाम देत आहेत.
दोन्ही नेत्यांच्या अध्यक्षतेखाली भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलची पहिली बैठकही झाली. या बैठकीत मोदी आणि बिन सलमान यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. काही गंभीर स्वरूपाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवण्याच्या उद्देशाने २०१९ मध्ये ‘भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल’ची स्थापना करण्यात आली होती.
बैठकीतील आपल्या प्रारंभिक भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की अनेक उपक्रमांमुळे आमची भागीदारी पुढच्या टप्प्यावर गेली आहे. आजच्या बैठकीतूनही आमच्या संबंधांना एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळणार आहे. चर्चेपूर्वी, राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात बिन सलमान यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. भारतात आल्याने मला खूप आनंद झाला आहे. जी-२० शिखर परिषदेबद्दल मी भारताचे अभिनंदन करतो, असे बिन सलमान यांनी पत्रकारांना सांगितले.
अनेक उपक्रमांमुळे भारत-सौदी अरेबियातील भागीदारी पुढच्या टप्प्यावर गेली आहे. आजच्या बैठकीतूनही आमच्यातील मैत्रीला एक नवी दिशा मिळेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान