प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आलेला शेख नबी अहमद या मुंबईच्या तरुणाला दूतावासामार्फत संपर्क साधून देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारताने केली आहे. यासंबंधी ‘पीटीआय’ने वृत्त दिले आहे. अहमद हा मुंबईतील जोगेश्वरी येथील रहिवासी आहे. इस्लामाबादमध्ये १९ मे रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
इस्लामाबादमधील सेक्टर एफ ८ परिसरातील निजामुद्दीन रस्त्यावरून जात असताना पोलिसांनी संशयावरून अहमदला अडवले होते. त्यावेळी भारतीय नागरीक असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर त्याच्याकडे व्हिसाची मागणी केली होती. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. वृत्तानुसार, अहमदने प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परदेशी नागरिक कायदा १९४६ अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच बेकायदेशीर प्रवेश आणि देशात वास्तव्य केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीटीआयच्या सूत्रांनुसार, पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनी अहमदला दूतावासामार्फत संपर्क साधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानकडे केली आहे. त्याआधी भारतीय तरुणाच्या अटकेसंदर्भात कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही, असे उच्चायुक्तांनी म्हटले होते. दरम्यान, भारतीय नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदला इस्लामाबादमद्ये अटक केल्याची माहिती समोर आली होती.