तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून भविष्यात पृथ्वीच्याबरोबरीने अवकाशातही युद्ध लढले जाईल. अशा अवकाश युद्धासाठी भारतही स्वत:ला सज्ज करत आहे. या आठवडयात भारत प्रथमच अवकाश युद्धाचा सराव करणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तिन्ही सैन्य दलांच्या आयडीएस संघटनेवर IndSpaceEx या युद्धसरावाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

चीन अवकाशात वेगाने विस्तारत असून प्रतिस्पर्धी देशाला अवकाशात रोखण्याची क्षमता चीनने विकसित केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भविष्यातील चीनचे आव्हान लक्षात घेता IndSpaceEx हा युद्धसराव महत्वाचा ठरणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवार असे दोन दिवस हा युद्धसराव चालणार आहे. भारताने यावर्षी २७ मार्चला ‘मिशन शक्ती’ अंतर्गत उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. भारताने यशस्वीरित्या अवकाशातील आपला उपग्रह क्षेपणास्त्र डागून पाडला होता.

त्यानंतर भारत अवकाश युद्धाचा सराव करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. चीन ए-सॅट शस्त्राबरोबर लेझर आणि इलेक्टो मॅग्नेटीक शस्त्रे वेगाने विकसित करत आहे. उद्या अवकाशातील आपल्या उपग्रहांवर हल्ला करण्याचे कोणी धाडस करु नये यासाठी स्पेसवॉरची क्षमता विकसित करण्याशिवाय भारताकडेही पर्याय नाही असे अधिकाऱ्याने सांगितले.

मिशन शक्तीच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ए-सॅट चाचणी भारताला सशक्त आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी केली असे म्हणाले होते. उद्या अवकाशात युद्ध झाल्यास भारतासमोर काय आव्हाने असतील, आपण कुठे कमी आहोत ते समजावे यासाठी IndSpaceEx हा युद्धसराव आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. भारताचा दीर्घकाळापासून मानवी विकासासाठी अवकाश कार्यक्रम सुरु आहे. सोमवारीच भारताने चांद्रयान-२ यशस्वीरित्या अवकाशात झेपावले. भविष्यातील अवकाशातील आव्हानांचा विचार करुन भारताने आतापासूनच ही तयारी सुरु केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीन हे देश आज आपल्यापुढे आहेत.