शस्त्रसंधीचे सतत उल्लंघन करणारा पाकिस्तान आणि भारताच्या सीमाभागात घुसखोरी करणाऱ्या चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी बुधवारी व्यक्त केले. आपण त्यांना योग्य ते उत्तर दिले नाही तर उन्मत्तपणे ते अशा घटना अधिक जोमाने करतील, असे त्यांनी सांगितले. अण्णा हजारे यांच्या समवेत ते येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. काश्मीरच्या ताबारेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यांच्याकडून भारता विरोधात छुपे युद्धही करण्यात येत आहे. त्यांना योग्यवेळी योग्य तो संदेश देणे आवश्यक आहे. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा आम्ही काही करणार नाही, अशी भूमिका भारताने घेतल्यास ते अधिक जामाने हल्ले करतील. हे थांबविण्यासाठी त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे. तसेच चीनकडून भारताच्या भूभागात घुसखोरी करण्यात येत आहे. त्यांच्या बाबतीतही १९५० सारखी बघ्याची भूमिका घेतली तर आपला भूभाग धोक्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या दोन्ही देशांना सरकारने चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. जेणे करून त्यांना आपण केलेल्या कृत्यांबद्दल योग्यती समज मिळेल. आणि पुढे ते ती करण्यास धजावणार नाहीत. अश्याप्रकारचा संदेश भारताने देणे आवश्यक असल्याचे सिंग यांनी सांगितले.