नवी दिल्ली : पाच हजार किलोमीटपर्यंतच्या टप्प्यातील लक्ष्ये अचूक टिपण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. यामुळे देशाच्या लष्करी सामर्थ्यांत मोठी भर पडली आहे.

ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सायंकाळी ७.५० च्या सुमारास ही चाचणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही किमान विश्वासार्ह प्रतिबंधाच्या भारतच्या धोरणाला अनुसरून असून, त्यामुळे ‘नो फर्स्ट यूज’बाबत असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे,’ असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सीमेवरील तिढा रेंगाळलेला असतानाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी होण्यास महत्त्व आहे.