हैदराबाद : ‘भारत २०३५मध्ये स्वत:च्या अवकाश स्थानकाची उभारणी करील आणि अवकाशयाने पहिले प्रारूप २०२८ मध्ये पृथ्वीभोवती कक्षेत स्थिर केले जाईल,’ अशी आशा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्राो) प्रमुख व्ही. नारायणन यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

भारताच्या गगनयान मोहिमेचे अनावरण २०२७च्या पहिल्या तिमाहीत होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. पुढील तीन वर्षांत भारताच्या अवकाशातील उपग्रहांची संख्या तिपटीने वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जी. पी. बिर्ला स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. नारायणन म्हणाले, ‘अवकाश तंत्रज्ञानात, तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेत आणि पायाभूत क्षेत्रात भारत २०४० पर्यंत इतर प्रगत देशांच्या बरोबरीने असेल. ‘इस्राो’ने या वर्षी बारा मोहिमांचे नियोजन केले आहे.

येत्या ३० जुलै रोजी यातील ‘नासा-इस्राो’ सिंथेटिक अॅपर्चर रडार (निसार) या मोहिमेचे भारताच्या जीएसएलव्ही एफ-१६ या प्रक्षेपकातून अनावरण करण्यात येईल.’

जपानबरोबर चांद्रयान-५ मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चांद्रयान-३’च्या यशानंतर जपानला भारताशी भागीदारी करण्याची इच्छा होती. त्यानुसार ‘इस्राो’ आणि जपानची अवकाश संस्था ‘जाक्सा’ एकत्रितपणे चांद्रयान-५ मोहिमेवर काम करीत आहेत. आम्ही एकत्रितपणे उपग्रह तयार करीत आहोत. जपानमधून त्यांचे अनावरण केले जाईल. चांद्रयान-३मधील लँडरचे वजन १६०० किलो होते. आता ते ६६०० किलो असेल. आम्ही त्यावर काम करीत आहोत. पुढील दोन वर्षांत या बाबत मोठी बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल.