नवी दिल्ली : इंधन सुरक्षेचा विचार करूनच भारत विविध स्रोतांतून परवडणाऱ्या किमतीत कच्च्या तेलाची खरेदी करत आहे आणि अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे भारताच्या या धोरणावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास केला जात असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.
निर्बंधानंतर भारतीय कंपन्या आता रशियाच्या सवलतीतील कच्च्या तेलाची आयात कमी करून अमेरिकेकडून आयात करण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, इंधन सुरक्षेच्या दृष्टीने भारताने नेहमी व्यापक भूमिका घेतली आहे आणि भारताचे हे धोरण जगभरात सर्वश्रुत आहे. अमेरिकेने ‘ल्युकॉईल’ आणि ‘रोझनेफ्त’ या कंपन्यांवर निर्बंध घातल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत भारताचा अभ्यास सुरू आहे.
आतापर्यंत आपण जागतिक बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीनुसारच निर्णय घेत आलो आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार चर्चा अद्याप सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. निर्बंधांनतर मागील आठवड्याभरात कोणत्याही भारतीय कंपन्यांनी रशियन तेलाच्या आयातीसाठी नोंद केलेली नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या अनेक दिवसांपासून ‘भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले होते,’ असा दावा करत आहेत.
दक्षिण कोरियाच्या दौऱ्यादरम्यान बुधवारी ट्रम्प यांनी भारताबरोबर व्यापार करार करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबिया यांच्यामध्ये व्यापार कराराबाबत सखोल चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते आहे. इराणमधील चाबहार बंदरावर भारतासाठी लादण्यात आलेले निर्बंधही अमेरिकेने सहा महिन्यांसाठी उठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
