भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीची अंतिम सामन्याइतकी दोन्ही देशांमध्ये उत्सुकता

पावसाने रद्द होणाऱ्या सामन्यांमुळे यंदाच्या विश्वचषकाचा ज्वर चाहत्यांमध्ये अद्यापही भिनला नसला तरी रविवारी मँचेस्टर येथे होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यामधील सामन्याची उत्सुकता मात्र दोन्ही देशांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

विश्वचषक स्पर्धेतील बहुचर्चित अशा सामन्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जाहिराती आणि समाजमाध्यमांतील टीकाटिपण्णीद्वारे जोरदार प्रचार करण्यात आला असून रविवारी मनोरंजनाच्या पर्वणीचा आनंद लुटण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी जय्यत तयारीही केली आहे.

सध्या दोन्ही देशांच्या सीमेवरील वातावरण तणावग्रस्त असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याद्वारे पुन्हा एकदा देशप्रेमाला उधाण आले आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातींमधून त्याची प्रचिती येत आहे. आता क्रिकेटच्या मैदानावर विराटसेना पाकिस्तानवर पुन्हा एकदा सरशी साधणार, याच आवेशात जणू दिवाळी साजरी करण्याचा चाहत्यांचा इरादा आहे. आत्मविश्वासात असणारा भारतीय संघ विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धचा अपराजित राहण्याचा विक्रम कायम राखतील, अशीच अशा चाहत्यांना वाटत आहे.

दुष्काळाने ग्रासलेला महाराष्ट्र सध्या वरुणराजाच्या जोरदार बरसण्याची वाट पाहत असतानाच इंग्लंडमध्ये जवळपास चार सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या सामन्यात ‘नको नको रे पावसा, असा अवेळी धिंगाणा,’ हीच प्रार्थना तमाम देशवासीय वरुणराजाकडे करत आहेत. दुपारपासूनच सर्वाच्या नजरा टीव्हीकडे लागणार असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पसरणार आहे. मात्र हेच रस्ते रात्री विजयी जल्लोषात न्हाऊन निघणार आहेत.

वातावरण चर्चामय..

मँचेस्टर येथे पावसाचे सावट नसल्याने सामना सुरळीत होण्याची चिन्ह आहेत. मात्र दर चेंडूगणिक भावनांचा अतिरेक घडविणाऱ्या या सामन्याच्या आस्वादासाठी दोन्ही देशांमधील प्रेक्षक आतुर आहेत. तहान-भूक हरपून टीव्हीसमोर सात तासांच्या त्राटकावस्थेत पोहोचणाऱ्या प्रेक्षकांच्या घरांमधले वातावरण रविवारी होणाऱ्या सामन्याच्या चर्चेनी भरून गेले आहे.