|| गौरव जोशी
अपेक्षेप्रमाणे भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी अक्षरश: भारतीय चाहत्यांनीच स्टेडियम भरले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच साऊदम्पटन रेल्वे स्थानक हे मुंबईतील चर्चगेट स्थानकाप्रमाणे वाटत होते. लीड्स, लंडन, ब्रिस्टल या ठिकाणांहून येणाऱ्या रेल्वेतून फक्त भारतीय चाहतेच बाहेर पडत होते. यातील जवळपास प्रत्येकानेच निळा टी-शर्ट आणि हातात तिरंगी झेंडा घेतला होता.
स्टेडियमच्या बाहेर गाडय़ांची दुतर्फा गर्दी जमली होती. थंडी असल्यामुळे स्वेटर, शाल आणि जॅकेटच्या आतमध्ये भारताचे टी-शर्ट घातले होते. लहान मुलांनी विराट कोहलीच्या नावाचे, तर मोठय़ा माणसांनी १९९९च्या विश्वचषकातील सचिन तेंडुलकरचे टी-शर्टसुद्धा परिधान केले होते. मराठी चाहते भगवे झेंडे घेऊन आले होते. त्याशिवाय एक प्रेमीयुगुल खास अमेरिकेहून हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. लीड्समधील भारतीय चाहत्यांनी पहाटे पाच वाजताची रेल्वे पकडून साऊदम्पटन गाठले. त्याशिवाय स्टेडियमपर्यंत पोहोचवण्यासाठी बसचा पर्यायसुद्धा उपलब्ध असल्याने तिथेही भारतीय पाठीराख्यांचीच गर्दी दिसत होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच ‘जितेगा भाई जितेगा, हमारा इंडिया जितेगा’ यांसारख्या घोषणांनी स्टेडियम दणाणून गेले. भारतीय खेळाडूंची बस जेव्हा स्टेडियममध्ये आली, त्या वेळी तर चाहत्यांनी सर्वोच्च आवाजात कल्लोळ केला.
काल उल्लेख केल्याप्रमाणे सकाळपासूनच हिल्टन एजेस बाऊल हॉटेलमध्ये चाहत्यांची धावपळ पाहायला मिळत होती. त्यामुळे जशी सामन्याला सुरुवात झाली, त्या वेळीच खरा विश्वचषक सुरू झाला, याची प्रचीती आली. जवळपास ९० टक्के चाहते भारतीयच होते. अमेरिका, कॅनडा, वेस्ट इंडिज यांसारख्या दूर देशांतूनही चाहते हा सामना पाहण्यासाठी हजर होते. जसप्रीत बुमराने पहिला चेंडू टाकताच संपूर्ण स्टेडियममध्ये ‘बुम बुम बुमरा’चाच गजर घुमला. त्यामुळे हा सामना भारतातच चालू आहे, असे वाटत होते. भारताचे पुढील सामने लंडन, नॉटिंगहॅम या शहरांत होणार असल्यामुळे त्या वेळी यापेक्षाही अधिक भारतीय चाहते पाहावयास मिळू शकतात. भारतीय चाहत्यांनी पुन्हा एकदा ते किती क्रिकेटवेडे आहेत हे सिद्ध केले आणि याचे पडसाद संपूर्ण इंग्लंडभर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सामना सुरू असतानाही स्टेडियमच्या बाहेरसुद्धा वेगळीच मजा सुरू होती. चहा, डोसा, बटर चिकन इत्यादी स्टॉल्सवर भारतीय चाहत्यांची तुफान गर्दी होती. त्यातही वातावरण काहीसे थंड असल्यामुळे चहाच्या स्टॉलवर चाहते रांग लावून चहाचा आस्वाद घेत होते. आपल्या गोलंदाजांनी जेव्हा आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट बाद केले, त्या वेळी उद्योगपतींपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच त्या क्षणाचा आनंद लुटत होते.