भारतीय लष्कराने नागरी वस्त्यांना लक्ष्य करु नका असा इशारा दिल्यानंतरही पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर काही निवडक भागात तुफान गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानी सैन्याला नागरी वस्त्यांना लक्ष्य न करण्याचा इशारा दिल्यानंतर नियंत्रण रेषेवरील एकूणच परिस्थिती शांत आहे. पण मागच्या २४ तासात पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यासाठी मोठया शस्त्रास्त्रांचा वापर केला आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या या शस्त्रसंधी उल्लंघनाला त्याच तोडीचे उत्तर दिले आहे. भारताच्या बाजूला कुठलीही जिवीतहानी झालेली नाही असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. भारतीय लष्कर पूर्णपण प्रोफेशनल असून नियंत्रण रेषेवर नागरीक जिवीतहानी टाळण्यासाठी कटिबद्ध आहोत.

आपल्या संरक्षण दलांनी दहशतवादविरोधी आणि दहशतवादी इन्फ्रास्ट्रकचर मोडून काढण्यासाठी कारवाई केली आहे. नागरीक जिवीतहानी टाळण्यासाठी नागरी वस्त्यांपासून लांब ही कारवाई करण्यात आली असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. पाकिस्तानकडून १२ तासांच्या आत दुसऱ्यांदा राजौरी जिल्ह्यातील नौशेरा आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला. नौशेरा आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये सकाळी १०.३०च्या सुमारास पाकिस्तानकडून दुसऱ्यांदा तुफान गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याने तोफ गोळयांचा मारा केला. भारताकडून पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सकाळी ४.३० च्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील सुंदरबनी आणि पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता.