India welcomes Trump-Putin Alaska meet : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे भेटणार आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये समक्ष चर्चा होणार आहे. या भेटीकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना भारताने या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीचे स्वागत करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये या बैठकीत युक्रेनमध्ये सुरु असलेला संघर्ष संपवण्याची आणि शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.

निवेदनात काय म्हटलं आहे?

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हे निवेदन पोस्ट केले आहे. “१५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्का येथे होणाऱ्या बैठकीसाठी अमेरिका आणि रशियन फेडरेशनमध्ये झालेल्या एकमताचे भारत स्वागत करतो,” असे परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनात म्हटले आहे.

“या बैठकीमुळे युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष संपवण्याची आणि शांततेच्या शक्यतांचा मार्ग मोकळा करण्याची आशा निर्माण झाली आहे. “हा युद्धाचा काळ नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा म्हटले आहे. म्हणून, भारत या आगामी बैठकीला पाठिंबा देतो आणि या प्रयत्नांना सहकार्य करण्यास तत्पर आहे.” असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान या भेटीपूर्वीच ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की ते रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना पुढच्या शुक्रवारी अलास्का येथे भेटतील आणि या भेटीमध्ये रशियाचे युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी चर्चा केली जाईल. २०२१ नंतर ही पहिलीच रशिया-अमेरिका बैठक असणार आहे. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनेव्हा येथे पुतिन यांची भेट घेतली होती.

या भेटीबद्दल ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची बहुप्रतिक्षित बैठक शुक्रवारी (१५ ऑगस्ट २०२५) अलास्काच्या ग्रेट स्टेटमध्ये होईल,” असं ट्रम्प म्हणाले.