कोलंबो : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे या पदावरील निवडीबद्दल अभिनंदन केले. श्रीलंकेत स्थैर्य, आर्थिक सुधारणा करण्यासाठी श्रीलंकावासीयांच्या लोकशाही मार्गानी सुरू असलेल्या प्रयत्नांना भारताचा कायम पाठिंबा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

कोलंबोतील भारतीय दूतावासाने एका ट्वीटद्वारे सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या निवडीबद्दल पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले.

दूतावासातर्फे सांगण्यात आले, की भारत-श्रीलंकेदरम्यान शतकांपासून असलेल्या पुरातन घनिष्ठ मैत्रीचे संबंध दृढ करण्यासाठी व उभय देशांच्या नागरिकांच्या हितसंवर्धनासाठी श्रीलंकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांसमवेत समन्वयाने काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगून मोदींनी श्रीलंकेत घटनात्मक मार्गाने स्थैर्य पुनप्र्रस्थापित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विक्रमसिंघेंशी भारताशी व भारतीय नेत्यांशी निकटचे संबंध आहेत. त्यांना मेमध्ये श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे देश सोडून गेल्यानंतर १३ जुलैला त्यांना काळजीवाहू राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. विक्रमसिंघे यांनी २२ जुलै रोजी दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.

दरम्यान, कोलंबोतील भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागळे यांनी मंगळवारी नवनियुक्त पंतप्रधान गुणवर्धने यांची राजकीय शिष्टाचारानुसार भेट घेऊन भारत सरकार आणि भारतीय नागरिकांतर्फे त्यांचे अभिनंदन केले. भारतीय उच्चायुक्तालयाने ट्वीट केले, की उच्चायुक्तांनी भारत-श्रीलंकादरम्यानचे दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले. 

भारतातर्फे आतापर्यंत चार अब्ज डॉलरची मदत मंगळवारी टंचाईग्रस्त श्रीलंकेला तमिळनाडू सरकारद्वारे देण्यात आलेला तांदूळ व औषधे सुपूर्द करण्यात आली. हा मदतीचा तिसरा टप्पा आहे. उच्चायुक्तालयातर्फे सांगण्यात आले, की भारत सरकार व भारतीय नागरिक श्रीलंकावासीयांसोबत आहेत. तमिळनाडू सरकारतर्फे देण्यात आलेली ही मदत तीन अब्ज चार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत श्रीलंकेला भारतातर्फे सुमारे चार अब्ज डॉलरची मदत देण्यात आली आहे.