Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं कौतुक केलं आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचं पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. तसेच भारत आता जगातील १०० देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्यात करणार असून या संदर्भातील २६ ऑगस्ट रोजी एक खूप मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

“तसेच तज्ञांच्या मते आता जागतिक विकासात भारताचं योगदान २० टक्के असेल. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा खूप मजबूत आहेत. महागाई कमी आहे, व्याजदर कमी आहेत, सीडीए नियंत्रणात आहे. परकीय चलन देखील मजबूत आहे. दरमहा अनेक देशांतर्गत गुंतवणूकदार एसआयपीद्वारे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. ते इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये बोलत होते.

“आम्ही साचलेल्या पाण्याच्या काठावर बसून फक्त खडे फेकणारे लोक नाहीत. तर वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वळवू शकणारे लोक आहोत”, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी अनेक अडथळे निर्माण केले. मात्र, तरीही सरकारने महत्वाची विधेयके मंजूर केली. या अधिवेशनात आयकर कायद्यातही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या दिवाळीपर्यंत जीएसटीत सुधारणा होतील. ज्यामुळे कर व्यवस्था सोपी होईल. जीएसटीमध्येही मोठी सुधारणा केली जात आहे. ही प्रक्रिया या दिवाळीपर्यंत पूर्ण होईल”, असं मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “१५ ऑगस्ट रोजी मी सविस्तर बोललो आहे. गेल्या आठवड्यात जे काही घडलं ते भारताच्या विकासाचा योग्य पुरावा आहे. आता या वर्षाच्या अखेरीस पहिली मेड-इन-इंडिया चिप बाजारात येईल. तसेच भारत विकसित भारत म्हणून आत्मनिर्भरतेसाठी सज्ज आहे. तसेच विकसित भारताचं स्वप्न साध्य करण्यासाठी आपल्याला आणखी पुढे जावं लागेल. स्वच्छ ऊर्जा, क्वांटम आणि बॅटरी स्टोरेजमध्ये खासगी क्षेत्रातील गुंतवणूकीची वेळ आली आहे. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन हा भारताचा मंत्र जागतिक विकासाच्या वातावरणावर मात करण्यास मदत करेल”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.