PM Modi’s Phone Call With Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात काल पहिल्यांदाच फोनवरून चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन व्यक्त केले. तसेच फेब्रुवारी महिन्यात मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांचाही मुद्दा उपस्थित केला. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, “ट्रम्प यांनी सांगितले की, मोदींशी स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा केली. बेकायदेशीर स्थलांतरितांना परत घेण्यासंदर्भात भारत योग्य ती कार्यवाही करेल. तसेच मोदी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा करणार आहेत.” भारताच्या परराष्ट्र खात्याने मात्र अद्याप यावर अधिकृत भूमिका मांडलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट करून दिली आहे. “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद वाटला. अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. द्वीपक्षीय संबंधातून दोन्ही देशांचा फायदा आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या लोकांचे कल्याण, जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षेसाठी आम्ही एकत्र काम करू, असा विश्वास व्यक्त केला”, असे पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

इंडो-पॅसिफिक, मध्य पूर्व आणि युरोपमधील सुरक्षा यासारख्या काही प्रमुख प्रादेशिक समस्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. भारताने अमेरिकन बनावटीच्या संरक्षण उपकरणांची खरेदी वाढवावी आणि अधिक संतुलित व्यापार संबंध वाढविण्याकडे वाटचाल करावी, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिल्या टर्मपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात शेवटचा विदेश दौरा भारतात केला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये उभय नेत्यांनी होस्टन आणि फेब्रुवारी २०२० मध्ये अहमदाबाद येथे जाहीर सभेला संबोधित केले होते. ट्रम्प हे दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी स्थलांतरितांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून भारताने चिंता व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा महत्त्वाची मानली जाते.