पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेचे महत्त्व भारतासाठी वाढले असून आम्हाला या भागातील देशांकडून सहकार्य व ठोस भागीदारीची अपेक्षा आहे, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या पहिल्या ईजिप्त दौऱ्यात सांगितले.
या भागातील अनिवासी भारतीयांना गुंतवणुकीसाठी आवाहन करताना त्यांनी सांगितले की, भारतीय उद्योग मंचच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना मदत करीत आहोत. आखात व पश्चिम आशिया तसेच उत्तर आफ्रिकेचे महत्त्व मोठे आहे, तेथे ७० लाख भारतीय असून ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनेही या भागाचे महत्त्व आहे, या देशांकडून सहकार्य मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अनिवासी भारतीयांनी भारतात गुंतवणूक क रावी, भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी मदत करावी. भारतात राजकीय व आर्थिक  क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. मोदी सरकारने देशाला एका नव्या शिखरावर नेण्याचे ठरवले आहे, भारताच्या विकास गाथेचा येथील लोकांनी भाग बनावे. चांगले प्रशासन, पारदर्शकता व शाश्वत विकासाला आम्ही वचनबद्ध आहोत. देशात उद्योगास अनुकूल वातावरण तयार होत आहे. मोदी सरकार आल्यानंतर पंधरा महिन्यात देशाची आर्थिक प्रगती झाली असून अनेक बदल झाले आहेत. अनिवासी भारतीयांच्या कल्याणासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. २२ व १६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगून झालेल्या दोन भारतीय कैद्यांना
ताब्यात देण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.