Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) आणि अमेरिकेतील कर्मचारी कपातीच्या निर्णयानंतर आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास हार्वर्ड विद्यापीठावर बंदी अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे. खरं तर ट्रम्प यांच्या निर्णयांचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे. यानंतर आता ट्रम्प यांच्या निर्णयांचा फटका हार्वर्डमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतासह विदेशातील विद्यार्थ्यांना बसला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता आणि कॅम्पसमधील कथित गैरवर्तनाचे कारण देत हार्वर्ड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी असलेले प्रमाणपत्र रद्द केले. यानंतर आता या निर्णयामध्ये आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. हार्वर्डमधील भारतीय व विदेशी विद्यार्थ्यांसाठी ६ अटींच्या पूर्ततेसाठी ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे. या अटींची पूर्तता जर केली नाही तर अनेक विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागू शकते.
दरम्यान, हार्वर्ड विद्यापीठाकडून परदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द केल्यानंतर हजारो भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीत आलं आहे. आता ट्रम्प प्रशासनाने ७२ तासांची मुदत दिली असून या वेळेत डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने हार्वर्डला विदेशी विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश देण्यासाठी ६ कठोर अटींचं पालन करण्यास सांगितलं आहे. स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठ आता F-१ किंवा J-१ व्हिसावर विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाही. त्यामुळे तब्बल ६८०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं करिअर अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये ८०० विद्यार्थी भारतातील असल्याचं सांगितलं जात आहे.
कोणत्या ६ अटींची पूर्तता करावी लागणार?
गेल्या ५ वर्षात कोणत्याही विदेशी विद्यार्थ्याने केलेल्या बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित सर्व माहिती हार्वर्डने द्यावी, अशी मागणी डीएचएसने केली. यामध्ये विद्यापीठाकडे असलेल्या सर्व प्रकारच्या नोंदी, त्यामध्ये डिजिटल, कागदी, ऑडिओ-व्हिडीओ फुटेज.
गेल्या ५ वर्षांत स्थलांतरित विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये किंवा कॅम्पसबाहेर केलेल्या हिंसक कृत्यांबाबतची सर्व माहिती डीएचएसला द्यावी लागणार. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि ऑडीओ किंवा व्हिडीओ फुटेजसह सर्व रेकॉर्ड.
गेल्या पाच वर्षांत एखाद्या विदेशी विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये किंवा कॅम्पसबाहेर इतर विद्यार्थ्यांना किंवा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना दिलेल्या धमक्यासंबंधित सर्व माहिती सादर करणे बंधनकारक आहे.
जर एखाद्या विदेशी विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं उल्लंघन केलं असेल त्यामध्ये जसं की भाषण स्वातंत्र्य प्रतिबंधित करणं, भेदभाव करणं, धमकावणं तसेच इतरांना त्रास देणे इत्यादी. त्या संबंधित सर्व कागदपत्रे आणि नोंदी डीएचएसकडे सादर करणं आवश्यक आहे.
गेल्या पाच वर्षांत प्रवेश घेतलेल्या विदेशी विद्यार्थ्यांचे सर्व शिस्तभंगाचे रेकॉर्ड डीएचएसकडे सादर करणं आवश्यक आहे.
गेल्या पाच वर्षांत हार्वर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विदेशी विद्यार्थ्याशी संबंधित कोणत्याही निषेधाच्या कृतीचे हार्वर्ड विद्यापीठाकडे असलेले सर्व रेकॉर्ड डीएचएसकडे सादर करणं आवश्यक आहे.