Shubhanshu Shukla : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून १५ जुलै रोजी पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या व्यावसायिक मोहिमेंतर्गत शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) गेले होते. हे चार अंतराळवीर सोमवारी (१४ जुलै) भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.५० वाजता आयएसएसवरून पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
आता शुभांशू शुक्ला यांच्यासह आणखी चार अंतराळवीर हे मंगळवारी दुपारी ३ वाजेदरम्यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरण्याची शक्यता आहे. त्यांचा हा तब्बल २२ तासांचा प्रवास असणार आहे. परतीच्या प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी हा एक अविश्वसनीय प्रवास होता असंही म्हटलं आहे. शुभांशू शुक्ला आणि ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील त्यांच्या बरोबरचे आणखी तीन क्रू सदस्य हे जवळपास १८ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहिले आहेत.
१८ दिवस राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू केला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. शुभांशू शुक्ला यांच्या परतीच्या प्रवासाबाबत नासाने प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, या मोहिमेत कोणताही अडथळा नाही. दरम्यान, शुक्लाच्या ‘आयएसएस’च्या प्रवासासाठी अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.
परतीच्या प्रवासापूर्वी शुभांशू शुक्लांनी काय संदेश दिला?
या मोहिमेचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. ज्यामध्ये शुक्ला बोलत होते. “हा एक अविश्वसनीय प्रवास होता. या मोहिमेत सहभाग असलेल्या लोकांमुळे तो अद्भुत आणि अविश्वसनिय बनला,” असे शुक्ला त्यांच्या निरोपाच्या भाषणात म्हणाले. शुभांशु शुक्ला त्यांच्या निरोपाच्या भाषणात पुढे हिंदीतून बोलताना म्हणाले की, “माझा हा प्रवास कमालीचा राहिला आहे. पण आता माझा हा प्रवास संपणार आहे, पण तुमचा आणि माझा प्रवास अजून खूप दूरपर्यंत आहे. आपला ह्यूमन स्पेस मिशनचा प्रवास खूप लांबचा आणि कठीण देखील आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो की आपण जर निश्चय केला तर ती शक्य आहे.”
आजचा भारत अंतराळातून कसा दिसतो?
शुक्ला यांच्यापूर्वी अंतराळात गेलेले पहिले अंतराळविर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारत कसा दिसतो या प्रश्नाचे उत्तर देताना ‘सारे जहाँ से अच्छा’ असं उत्तर दिलं होतं. त्या ओळींना शुक्ला यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. शुक्ला म्हणाले की, “४१ वर्षांपूर्वी एक भारतीय अंतराळात गेले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितले होते की वरून भारत कसा दिसतो. कुठेतरी आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं आहे की आज भारत कसा दिसतो, मी तुम्हाला सांगतो. आजचा भारत स्पेसमधून महत्वकांशी दिसतो, आजचा भारत निर्भीड दिसतो, आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला दिसतो, आजचा भारत अभिमानाने भरलेला दिसतो. याच सर्व कारणांमुळे मी पुन्हा एकदा म्हणू शकतो की आजचा भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो. लवकरच जमिनीवर भेटू.”