नवी दिल्ली : उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे विमान वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या विमानतळांसाठी अतिरिक्त सूचना जारी केल्या आहेत. त्यात प्रवाशांच्या मदतीसाठी विमानतळावर तक्रार निवारण कक्ष (वॉर रूम) उभारण्याबरोबरच सुरक्षा रक्षकांची कुमकही वाढविण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> उत्तर भारतातील धुक्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत; प्रचंड विलंबामुळे प्रवासी संतप्त

नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मंगळवारी विमानतळांवरील अतिरिक्त सुविधांबाबत विमानतळे तसेच विमान कंपन्यांना अतिरिक्त सूचना दिल्या. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली असून सर्व कंपन्यांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. विमानतळांवर पुरेशा प्रमाणात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी २४ तास उपलब्ध असतील, असेही त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर जाहीर केले. धुके अधिक असलेल्या विमानतळांवर ‘सीएटी-३’ ही प्रणाली असलेल्या धावपट्टया कार्यान्वित केल्या जातील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्या  दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चारपैकी तीन धावपट्टी या प्रणालीने कार्यान्वित आहेत. धुक्याशी संबंधित व्यत्ययांचा सामना करण्यासाठी आणखी पावले उचलली जात असल्याची घोषणाही त्यांनी केली .

नव्या उपाययोजना

’ सहा महानगरांतील विमानतळांना दिवसातून तीनदा दैनंदिन घडामोडींचा अहवाल अनिवार्य

’ ‘डीजीसीए’ने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पूर्ततेबाबत नियमित तपासणी 

’ प्रवाशांच्या तक्रारींची तातडीने दखल आणि निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष 

’ सीआयएसएफच्या पुरेशा तुकडया २४ तास तैनात 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’ दिल्ली विमानतळावर अद्ययावत ‘सीओटी ३’ कार्यप्रणाली असलेल्या धावपट्टया कार्यान्वित