All Party Delegation Anti-Terror Outreach : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हाती घेतली होती. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता भारताने पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक अभियान सुरू केलं आहे. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात सात खासदारांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या नेतृत्वाखाली इतर काही खासदार व अधिकाऱ्यांचाही समावेश केला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे खासदार, अनेक माजी मंत्री व आठ माजी राजदूतांसह एकूण ५९ राजकीय नेत्यांची सात शिष्टमंडळे तयार करण्यात आली आहेत.
भारताने तयार केलेली शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तिथल्या लोकांसमोर भारताची बाजू मांडतील. भारताच्या या अभियानाची आजपासून सुरूवात होत असून ही सर्वपक्षीय शिष्टमंडळे ३२ देश व युरोपियन संघाचा दौरा करतील. पाकिस्तानचा जगासमोर पर्दाफाश करणे, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची क्रूरकृत्ये जगासमोर मांडणे आणि दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासाठी जागतिक समर्थन मिळवणे हे या शिष्टमंडळाचं प्रमुख उद्दीष्ट आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी तीन शिष्टमंडळांना याबाबतची माहिती दिली.
‘या’ ३३ देशांचीच निवड का केली?
विक्रम मिस्री यांनी आधीच सांगितलं होतं की “खूप विचार करून आम्ही या ३३ देशांची निवड केली आहे”. याबाबत विचारल्यावर भाजपा खासदार अपराजिता सारंगी म्हणाल्या, “या ३३ पैकी १५ देश हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) कायमचे अथवा तात्पुरते सदस्य आहेत. तर पाच देश यूएनएससीचे सदस्य बनणार आहेत. तसेच उर्वरित १३ असे देश आहेत जे यूएनएससीचे सदस्य नसले तर जागतिक व्यासपीठावर त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे. त्यांचं जगात चांगलंच वजन आहे.त्यामुळे अशा देशांचं भारताला समर्थन मिळणं आवश्यक आहे.
या देशांचा दौरा करणार
भारत सरकारने बनवलेली शिष्टमंडळे सौदी अरब, कुवैत, बाहरीन, अल्जेरिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क, अमेरिका, ब्राझील, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, यूएई, रशिया, इजिप्त, कतार, इथियोपिया, , स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटव्हिया व दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहेत.