Crime News : अमेरिकेतील तीन राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची ४००,००० अमेरिकन डॉलर्सची फसवणूक प्रकरणात सहभागी असल्याप्रकरणी एका बेकायदेशीर भारतीय स्थलांतरिताला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निरव पटेल असे या भारतीय व्यक्तीचे नाव असून त्याला फेब्रुवारीमध्ये एकवेळी वायर आणि मेल फसवणूक करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी, तीन वेळा वायर फसवणूक आणि एकदा अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी एलियन एनेमीज अॅक्ट ऑफ १७९८ नुसार दोषी ठरवण्यात आले आहे.
इलिनॉयच्या दक्षिण जिल्ह्याचे यूएस अॅटर्नी Steven D Weinhoeft यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्याने (पटेल) कबुल केले की तो इलिनॉय येथे हे राज्य त्याला ड्रायव्हिंग लायसन्स देईल म्हणून आला आणि त्यानंतर त्याने त्या लायसन्स वापर त्याने संपूर्ण मध्य पश्चिमेत वृद्धांची फसवणूक करून त्यांना लुबाडण्यासाठी केला.
कशी केली जात होती फसवणूक?
डिसेंबर २०२४ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला, ज्यामध्ये आरोपी हे सरकारी अधिकारी असल्याचे भासवत होते. या प्रकरणात वृद्धांना टेक्स्ट मेसेज आणि ईमेल पाठवून लक्ष्य केले जात होते, ज्यामध्ये त्यांना त्यांचे अमेझॉन अकाउंट हॅक झाल्याची बतावणी केली जात असे. त्यानंतर मेसेजला जेव्हा पीडित व्यक्ती प्रतिसाद देत, तेव्हा तो कॉल स्वत:ला फेडरल एजंट असल्याचे सांगणार्या आरोपीकडे वळवला जात असे. ज्यामध्ये आरोपी पीडितांना पटवून देत की, ते आयडेंटीटी चोरीचे शिकार ठरले आहेत आणि त्यांची आयुष्यभराची कमाई बनावट यूएस ट्रेझरी किंवा FTC ट्रस्ट खात्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना काढून घ्यावी लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
पुढे निवेदनात सांगण्यात आले आहे की, खरंतर ती कमाई चोरी केली जाई आणि अखेरीस भारतात फसवणूक करणार्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जात होती. फसवणूक करणारे आरोपी पीडितांना सतत फोन करून त्यांना गुंतवून ठेवत, कधीकधी तर दिवसात १२ वेळा ते पीडितांना फोन करत. इतकेच नाही तर पीडितांना त्यांच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना काय सुरू आहे याबद्दल सांगितलं तर कारवाई केली जाईल अशी भीती देखील घालत.
पटेल याच्यावर आरोप होता की, तो वृद्ध पीडितांच्या घरी जाऊन रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू गोळा करायचा. एका प्रकरणात तर पटेलने एका वृद्ध महिलेच्या घरातून ७७,००० डॉलर्स किमतीचे सोन्याचे बार गोळा केले होते. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेला चालण्यासाठी आधाराची गरज लागायची आणि ती ऑक्सिजनवर होती, अशा महिलेला देखील या आरोपींनी लुबाडले.
इतर फसवणुकीच्या आरोपांबरोबरच पटेल हा बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसखोरी केल्याप्रकरणीही दोषी आढळला आहे. पुरव्यानुसार पटेल याने व्हँकुव्हरजवळून अमेरिकेत बेकायदेशीर घुसखोरी केली, त्यानंतर तो जॉर्जिया येथे तो या फसवणूक करणार्यांच्या संपर्कात आला.
पटेल याचे हे फसवणूकीचे काम शिकागोमध्ये चालत होते होते, जेथे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असूनही इलिनॉयचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकत होता. या फसवणुकीच्या प्रकरणात वृद्ध पीडितांकडून पैसे आणि सोने गोळा करण्यासाठी पटेल हा विस्कॉन्सिन, इलिनॉय आणि इंडियानामधून शेकडो मैल प्रवास करत असे. दरम्यान पटेल याने कोर्टात त्याला नेमकं काय सुरू आहे याची कल्पना नव्हती असा दावा केला होता. मात्र फसवणूक करणारे त्याच्यावर शेकडो आणि हजारो डॉलर्स हाताळू देण्याइतपत विश्वास करत होते, असे म्हणत कोर्टाने त्याचा हा दावा फेटाळून लावला.