संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते मंगळवारी विविध मोहिमांसाठी सज्ज अशा दोन ‘स्टील्थ फ्रिगिट्स’ नौदलात दाखल करण्यात आल्या. ‘आयएनएस उदयगिरी’ आणि ‘आयएनएस हिमगिरी’ अशी या दोन युद्धनौकांची नावे आहेत. सागरी सुरक्षेमध्ये यामुळे भर पडणार आहे, असे नौदलाने म्हटले आहे.

नौदलाच्या ‘प्रकल्प १७ अ’ या अत्याधुनिक प्रकल्पांतर्गत युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बांधणी झालेल्या दोन युद्धनौका एकाच वेळी नौदलात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या पूर्व भागातील सागरी सुरक्षेचे महत्त्व यामुळे अधोरेखित झाले आहे.

देशी बनावटीची शंभरावी नौका

नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाइन ब्यूरो’ने रचना केलेली ‘उदयगिरी’ ही शंभरावी युद्धनौका ठरली आहे. देशी बनावटीच्या नौकाबांधणीच्या गेल्या ५० वर्षांच्या काळातील हा सुवर्णक्षण ठरला आहे. या दोन्ही युद्धनौका शिवालिक वर्गातील असून, आधीच्या युद्धनौकांपेक्षा रचना, शस्त्रप्रणाली आणि इतर बाबतींत त्या अत्याधुनिक असल्याची माहिती संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी दिली.

‘उदयगिरी’ ही ‘प्रकल्प १७ अ’ अंतर्गत तयार करण्यात आलेली स्टील्थ फ्रिगिट आहे. मुंबईतील ‘माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड’ने नौकाबांधणी केली आहे. ‘हिमगिरी’ ही ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स’मध्ये बांधणी झालेली या प्रकल्पांतर्गत असलेली पहिली नौका आहे.

दोन युद्धनौकांची वैशिष्ट्ये

– वजन (डिस्प्लेसमेंट) – ६७०० टन

– युद्धनौकांवर अत्याधुनिक शस्त्रे : शस्त्रांमध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, तोफा आणि इतर शस्त्रे असतील.

– युद्धनौकांमुळे भारतातील २०० ‘एमएसएमई’ क्षेत्रामध्ये चार हजार थेट रोजगार आणि १० हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली.

– युद्धनौकांमध्ये ७५ टक्के देशी सामग्री.

केवळ सागरी सुरक्षेपुरते नव्हे, तर नौदल राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेमध्येही महत्त्वाचा स्तंभ आहे. भारताला आवश्यक असणारी तेल, नैसर्गिक वायू ही ऊर्जासाधने या भागातील असलेल्या सागरी सुरक्षेवर अवलंबून असतात. दोन युद्धनौका दाखल झाल्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. – राजनाथसिंह, संरक्षणमंत्री