Indian Nurse Nimisha Priya in Yemen Death Sentence Cancelled : भारतीय नर्स (परिचारिका) निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. भारताचे ग्रॅन्ड मुफ्ती कांथापुरम एपी अबूबकर मूसलियार यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिल्याचा दावा एएनआय या वृत्तसंस्थेने केला होता. या वृत्तात म्हटलं होतं की ग्रॅन्ड मुफ्तींच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा जी आधी स्थगित करण्यात आली होती, ती आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. मात्र, हे वृत्त खोटं असल्याचं समोर आलं आहे.
एएनआयने ग्रॅन्ड मुफ्तींच्या कार्यालयाचा हवाला देत म्हटलं होतं की येमेनची राजधानी सना येथे सोमवारी (२८ जुलै) एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र येमेनमधील सरकार, तिथल्या न्यायालयाने असा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे निमिषा प्रियाच्या डोक्यावरील फाशीची टांगती तलवार कायम आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर निमिषा प्रियाचं प्रकरण चर्चेत आहे. निमिषावर तिच्या व्यावसायिक भागीदाराची हत्या केल्याचा आरोप आहे. या हत्या प्रकरणी मार्च २०१८ मध्ये तिला दोषी ठरवण्यात आलं होतं. २०२० मध्ये तिला येमेनी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.
नेमकं प्रकरण काय?
निमिषा प्रिया ही मूळची केरळमधील रहिवासी असून २००८ साली ती कामानिमित्त येमेनला गेली होती. तिथे काही वर्षे अनेक रुग्णालयांमध्ये तिने परिचारिका म्हणून काम केलं. त्यानंतर २०१५ साली तिने तलाल अब्दो मेहदी याच्याबरोबर स्वतःचा दवाखाना सुरू केला. मेहदी हा तिचा स्थानिक पार्टनर (व्यावसायिक भागीदार) होता. येमेनमध्ये पार्टनर म्हणून स्थानिक व्यक्तीला उद्योगात बरोबर घेण्यासंबंधीचा कायदा आहे. सुरुवातीची काही वर्षी नीट गेली मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. तसेच निमिषा प्रिया हिने मेहदीवर पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला. यामुळे दोघांमधील भांडण विकोपाला गेलं. त्यानंतर मेहदीने निमिषा प्रियाचा पासपोर्ट घेतला. मेहदीकडून पासपोर्ट परत मिळवण्यासाठी प्रियाने कथितपणे त्याला सेडेटिव्हजचे इंजेक्शन दिले. पण त्याचा ओव्हरडोस होऊन त्याचा मृत्यू झाला.
कोण आहेत ‘ग्रॅन्ड मुफ्ती’?
निमिषा प्रियाला दिली जाणारी फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. ही शिक्षा थांबवण्यासाठी ‘ग्रँड मुफ्ती’ कांथापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मुसलियार यांना ‘ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया’ म्हणून देखील ओळखलं जातं.