Mark Zuckerberg Record Breaks: जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना वयाच्या २३ व्या वर्षी मिळाला होता. परंतु, त्यांचा हा विक्रम आता मोडण्यात आला आहे. अमेरिकेतील तीन तरुणांनी मेरकॉर या टेक कंपनीची स्थापना केली. याच कंपनीच्या सह-संस्थापक असलेल्या तिघांना त्यांच्या वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान मिळाला आहे. या तिघांपैकी दोन तरुण हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत, तर एक जण अमेरिकन आहे. त्यांच्या कंपनीचे मूल्य तब्बल १० अब्ज डॉलर (१ अब्ज = १०० कोटी) इतके असून त्यांच्या कंपनीत ३५० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक नुकतीच करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कंपनी सुरू करणाऱ्या तिघांना महाविद्यालयीन शिक्षण सोडून कंपनी सुरू करणाऱ्यांना मिळते ती फेलोशिप मिळाली होती.

मेरकॉर (Mercor) ही अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एक टेक कंपनी आहे. २०२३ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. भारतीय वंशाचे अमेरिकन असलेले आदर्श हिरेमठ, सूर्या मिधा आणि ब्रॅण्डन फूडी हे या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. या तिघांचेही शिक्षण एकाच शाळेत झाले असून डिबेट स्पर्धांमध्ये तिघेही सहभागी होत असत. अमेरिकेत महाविद्यालयीन शिक्षण सोडून कंपनी स्थापन करणाऱ्या काही ठराविक ध्येयवेड्यांना पीटर थील (Peter Thiel) ही फेलोशिप दिली जाते. या फेलोशिप अंतर्गत एक लाख डॉलर दिले जातात. मेरकॉर कंपनी स्थापन करणाऱ्या या तिघांनाही पीटर थील फेलोशिप याआधी मिळाली आहे. आता त्यांच्या कंपनीत फेलिसीस व्हेन्चर्सने ३५० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यानुसार त्यांच्या कंपनीचे मूल्य दहा अब्ज डॉलर इतके ठरविण्यात आल्याने तिघांना जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान मिळाला आहे.

कंपनीचा सह-संस्थापक आदर्श हिरेमठ म्हणाला, “मी जर मेरकॉरसाठी काम सुरू केले नसते तर आज महाविद्यालयातून फक्त पदवी मिळवून बाहेर पडलो असतो. सगळं काही खूप वेगाने बदललं आहे.” मेरकॉर कंपनीच्या तिन्ही सह-संस्थापकांकडे कंपनीचे प्रत्येकी २२ टक्के शेअर्स आहेत. भारतातील सॉफ्टवेअर अभियंत्यांना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे काम मेरकॉर ही टेक कंपनी करते. ही कंपनी सॉफ्टवेअर अभियंत्यांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरीसाठी मुलाखतींचे आयोजन करून देते. एआय रिसर्च लॅब आणि ओपनएआय यांसारख्या कंपन्यांना मेरकॉर मनुष्यबळ पुरवण्याचे काम करते. या स्टार्ट अप कंपनीची प्रगती सध्या वेगाने होत आहे. मार्क झुकरबर्ग यांचा विक्रम देखील या कंपनीच्या सह-संस्थापक तरुणांनी मोडला आहे.

याआधीचे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश

जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा विक्रम या आधी पॉलिमार्केटचे सीईओ शेन कोपलान यांनी वयाच्या २७ व्या वर्षी केला होता. त्यांच्या आधी हा विक्रम स्केल एआयच्या अलेक्झांडर वँग आणि लुसी गुओ यांच्या नावावर होता. परंतु, फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सगळे विक्रम मोडून वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी अब्जाधीश होण्याचा मान मिळवला. त्यानंतर आता आदर्श हिरेमठ, सूर्या मिधा आणि ब्रॅण्डन फूडी (तिघांचे वय २२ वर्ष) या तिघांनी मार्क झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला असून तिघेही जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत.