करोना लसीच्या वापराला परवानगी देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. ब्रिटनने मागील आठवड्यात फायझर व बायोएनटेकच्या लसीला वापरासाठी परवानगी दिली. त्यानंतर ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरूवात होणार असून, भारतीयांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे करोना लसीचा जगातील सर्वात पहिला डोस एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला दिला जाणार आहे. ब्रिटनमध्ये कोविड लसीकरण कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. लसीकरण मोहिमेत राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ही लस देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनमध्ये फायझर व बायोएनटेकच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीला परवानगी तातडीने परवानगी देण्यात आली. आता लसीकरण सुरू होणार असून, भारतीय वंशाच्या ८७ वर्षीय हरी शुक्ला यांना ही लस सर्वप्रथम देण्यात येणार आहे. “लसीचे पहिले दोन डोस घेणं हे माझे कर्तव्य आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लसीकरणासंदर्भात घोषणा करून एक मोठं पाऊल उचललं आहे,” अशा भावना हरी शुक्ला यांनी लस घेण्याआधी व्यक्त केल्या आहेत.

हरी शुक्ला यांना या लसीकरणासंदर्भात फोनवरून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. करोना व्हायरस विरोधातील या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितलं. लसीचे पहिले दोन डोस घेणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. “मला आनंद आहे की आम्ही हा साथीचा आजार संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ही लस घेवून मी आपले काम करत असल्याचा मला अभिमान आहे. मी जे काही करतो आहे, ते माझे कर्तव्य आहे. लसीकरण सुरू होणं हा एक फार मोठा दिलासा आहे, कारण हे एक सामान्य संकट नाही. मी घाबरलो आहे असं काही नाही. मी खूप उत्सुक आहे. ” असं  हरी शुक्ला म्हणाले.

आणखी वाचा- भारतात एका व्यक्तीच्या लसीकरणासाठी ३० मिनिटं, तीन खोल्या अन्….. समजून घ्या संपूर्ण प्लान

ब्रिटनमध्ये राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच ८० आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना ही लस सर्वात प्रथम देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून लसीच्या आठ लाख कुप्या (छोट्या बॉटल) उपलब्ध होणार असून, सरकारनं ४ कोटी कुप्यांची मागणी नोंदवली आहे. त्यातून २ कोटी लोकांना लस देता येईल, कारण लसीच्या दोन मात्रा देणं अपेक्षित आहेत. ब्रिटनमध्ये करोना बळींची संख्या ६१ हजारांवर गेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian origin hari shukla 87 first to get coronavirus vaccine in uk abn
First published on: 08-12-2020 at 11:48 IST