अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था सर्वश्रुत आहे. मात्र, त्यांना एका भारतीय वंशाच्या अमेरिकी युवकानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या १९ वर्षीय युवकानं त्यासाठी थेट एक ट्रकच व्हाईट हाऊसच्या सेक्युरिटी बॅरिअर्सवर चढवला. या युवकाला व्हाईट हाऊस पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ट्रकमधून नाझी ध्वज हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या युवकाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

साई वर्षित कंदुला असं या १९ वर्षीय युवकाचं नाव आहे. तो सेंट लुईसमधल्या चेस्टरफिल्ड या उपनगराचा रहिवासी आहे. त्यानं सोमवारी रात्री १० च्या सुमारास एक ट्रकच व्हाईट हाऊसच्या सेक्युरिटी बॅरिकेट्सवर चढवल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ एका प्रत्यक्षदर्शीनं काढल्यामुळे नेमकं तेव्हा काय घडलं, हे समोर आलं आहे. त्यानं दोन वेळा हा ट्रक सेक्युरिटी बॅरिकेट्सवर चढवल्यानंतर मोठा आवाज झाला आणि लगेच व्हाईट हाऊस पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. व्हाईट हाऊसच्या उत्तरेकडच्या बाजूला हा प्रकार घडला. इंडियन एक्स्प्रेसनं असोसिएटेड प्रेसच्या हवाल्याने यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

या प्रकारानंतर साई कंदुला या ट्रकमधून खाली उतरला. पोलिसांनी त्याला लगेच अटक केली. यावेळी आपण इथे अमेरिकेचं सरकार ताब्यात घ्यायला आलो असून जो बायडेन यांना ठार करायचं आहे असं तो म्हणाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कंदुलानं हा ट्रक व्हर्जिनियातून भाडेकरारावर घेतला होता. “ट्रकच्या ड्रायव्हरनं दोन वेळा ट्रक त्या बॅरिकेट्सवर चढवला. पहिल्यांदा जेव्हा त्यानं हे केलं, तेव्हा मी फोन काढून ते शूट करायला लागलो. पण जेव्हा त्यानं दुसऱ्यांदा हे केलं, तेव्हा मात्र मी तिथून काढता पाय घेतला”, अशी माहिती २५ वर्षीय झबोजी यानं दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रकमधून नाझी ध्वज हस्तगत

दरम्यान, या युवकाच्या ट्रकमधून नाझी ध्वज ताब्यात घेतल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या युवकाची सखोल चौकशी केली जात असून त्याचे अजून कुणाशी लागेबांधे आहेत की नाही, यासंदर्भात व्हाईट हाऊस पोलीस तपास करत आहेत.