Railway Recruitment: देशात बेरोजगारीचे भीषण चित्र आहे, हे वारंवार दिसून येते. सरकारी नोकरभरती असो किंवा खासगी क्षेत्रातील चांगल्या नोकऱ्या असोत, इच्छुक उमेदवारांची मोठी रांग या नोकऱ्या मिळविण्यासाठी लागलेली दिसते. रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. २०२४ साली रेल्वेने ६४,१९७ पदांची भरती काढली होती. या भरतीसाठी तब्बल १.८७ कोटी अर्जदारांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. रेल्वे मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

रेल्वेमध्ये किती पदे रिक्त आहेत आणि ती वेळेत भरण्यासाठी रेल्वे कोणती पावले उचलणार आहेत, याबाबतचा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतची आकडेवारी संसदेत देण्यात आली.

संसदेत दिलेल्या उत्तरात म्हटले गेले की, मागच्या चार ते पाच वर्षांत नोकरभरतीवरील दबाव वाढला आहे. सध्या रेल्वेत असलेले अनेक कर्मचारी निवृत्तीच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. तसेच रेल्वेचे जाळे वाढत असून आधुनिकीकरण होत आहे. यामुळे नोकरभरतीवरील ताण वाढत आहे.

रेल्वेतील नवीन सुरक्षा प्रणाली, विद्युतीकरण प्रकल्प, यांत्रिकीकरण आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे नव्या प्रकारची पदा निर्माण झाली आहेत, तसेच काही जुनी पदे कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे नोकरभरतीची गरज वाढू लागली आहे.

उपलब्ध पदे आणि स्पर्धा

रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १.०८ लाख पदांसाठी भरती सुरू आहे. ज्यामध्ये ९२,११६ पदांसाठीची जाहिरात २०२४ मध्येच काढण्यात आली आहे. यात प्रामुख्याने असिस्टंट लोको पायलट (एएलपी), तंत्रज्ञ, आरपीएफ कर्मचारी, कनिष्ठ अभियंते, पॅरामेडिकल कर्मचारी आणि अत्यंत मागणी असलेल्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (एनटीपीसी) यांचा समावेश आहे.

नोकरीसाठी तीव्र स्पर्धा

आरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी ४५,३०,२८८ एवढे विक्रमी अर्ज आले होते. तर इतर पदांसाठी सरासरी १,०७६ अर्ज आले होते. तांत्रिक पदांसाठीही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.