गेल्या तीन-चार महिन्यांत परदेशात भारतीय नागरीक किंवा भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. आता अमेरिकेतील ओहिओ येथे एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची माहिती न्यू यॉर्क येथील भारतीय वाणिज्य दुतावासाने दिली. या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

“क्लीव्हलँड ओहिओमधील भारतीय विद्यार्थीनी उमा सत्य गड्डे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे”, असं न्यू यॉर्कमधील भारतीय महावाणिज्य दूतावासाने X पोस्टवर म्हटलं आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत, असंही वाणिज्य दूतावासाने कळवलं आहे. तसंच, ते या विद्यार्थीनीच्या भारतातील कुटुंबीयांशीही संपर्कात आहेत. “उमा गड्डे यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात पोहोचवण्यासह सर्व शक्य सहाय्य केले जात आहे”, असंही वाणिज्य दूतावासाने सांगितले.

२०२४ च्या सुरुवातीपासून यूएसमध्ये भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे किमान अर्धा डझन मृत्यू झाले आहेत. भारतीय वंशाच्या विद्यार्थी आणि नागरिकांवर सातत्याने हल्ले होत असल्याने परदेशातील भारतीय समुदायांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >> निवडणुकीत हस्तक्षेपाचा चीनचा प्रयत्न! ‘एआय’चा वापर होण्याची शक्यता, मायक्रोसॉफ्टचा संशय

गेल्या महिन्यात भारतातील ३४ वर्षीय प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना अमरनाथ घोष यांची सेंट लुईस, मिसुरी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर, पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये २३ वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी समीर कामथ ५ फेब्रुवारी रोजी इंडियाना येथील निसर्ग संवर्धनामध्ये मृतावस्थेत आढळला होता. २ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात ४१ वर्षीय भारतीय वंशाचे आयटी एक्झिक्युटिव्ह विवेक तनेजा यांना जीवघेणी दुखापत झाली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

भारतीय दुतावासाने अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

भारतीय आणि भारतीय वंशाच्या व्यक्ती/विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावास आणि त्यांच्या विविध ठिकाणच्या वाणिज्य दूतावासांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण यूएसमधील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या संवादात विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. प्रभारी राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांच्या नेतृत्वाखालील ९० यूएस विद्यापीठांमधील सुमारे १५० भारतीय विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात अटलांटा, शिकागो, ह्यूस्टन, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को आणि सिएटल येथील भारताचे काऊन्सिल जनरलही उपस्थित होते.