भारतीय प्रवाशांनी आठवड्यात त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तानला त्यांनी दणका दिला आहे. अझरबैयजान आणि तुर्कीयेतील बुकिंग ६० टक्के कमी झालं आहे. तर मागच्या काही दिवसांमध्ये एकूण बुकिंग रद्द करणाऱ्यांची संख्या २५० टक्के वाढली आहे. आपल्या देशाबद्दल एकजुटीच्या भावनेत आणि आपल्या सशस्त्र दलांच्या प्रति गहिरा आदर व्यक्त करत आम्ही पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहेत. त्यांच्या या भावनांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अझरबायजान आणि तुर्कीमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देतो. या दोन ठिकाणांवर पर्यटनास प्रोत्साहन न देण्यासाठी आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या प्रमोशन्स आणि ऑफर बंद केल्या आहेत असं मेक माय ट्रिपच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
पहलागम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले. ज्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात कारवाई केली. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पाकिस्तानने ३५० हून अधिक तुर्कि बनावटीच्या ड्रोनचा उपयोग भारताविरोधात हल्ल्यांसाठी केला. तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि भारताशी दोन हात करत होता का? हा प्रश्न चर्चिला गेला. तसंच ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर हल्ले करण्यासाठी तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत केली. त्याचाच निषेध आता भारतीय प्रवाशांनी नोंदवला आहे.
तुर्कस्तानवर भारतीयांचा बहिष्कार
बॉयकॉट तुर्की या मोहिमेने देशभरात जोर धरला आहे. तुर्कस्तानहून भारतात येणाऱ्या वस्तू, तसंच फळांवरही बहिष्कार घालण्यात आला आहे. पुण्यातल्या बाजारांमध्ये तुर्कस्तानहून सफरचंदं येतात. साधारण या आयात-निर्यातीत १ हजार कोटींची उलाढाल होते. मात्र हे देखील आता बंद करण्यात आलं आहे. गाझियाबाद, साहिबाबाद येथील फळ व्यापाऱ्यांनीही तुर्कस्तानची सफरचंदं आणि इतर फळांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
संगमरवराची आयातही बंद
आशिया खंडात सर्वात मोठा संगमरवराचा व्यापार उदयपूर या ठिकाणी होतो. या ठिकाणाच्या व्यापाऱ्यांनीही तुर्कस्तानातून संगमरवर आयात करणं थांबवलं आहे. तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला म्हणून हा निर्णय आम्ही घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराणा यांनी सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तानला तुर्कस्तान पाठिंबा देत राहिल तोपर्यंत त्यांच्याशी कुठलाही व्यापार व्यवहार होणार नाही. भारतात जे संगमरवर येतं त्यातलं ७० टक्के भाग तुर्कस्तानातून येतो. मात्र आम्ही आता आयात बंद केली आहे.