सुमारे ५ हजार किलोमीटरचा पल्ला असणाऱ्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी – ५’ या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केल्यानंतर चीनने या विषयी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. उभय देशांनी परस्परांमधील राजकीय विश्वास वृद्धिंगत करण्याची गरज अधोरेखित करतानाच दोन देशांमधील संबंध सुधारण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग ली यांनी भारताच्या अग्नी -५ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. चीन आणि भारत या दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था अत्यंत विशाल आणि जागतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असून त्यांच्यात अधिकाधिक सहकार्य विकसित होणे गरजेचे आहे, असे ली यांनी सांगितले. भारतीय उपखंडात स्थैर्य व शांतता नांदावी यासाठी प्रसारमाध्यमांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामगिरी बजावणे, चीन व भारत या दोघांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
गतवर्षी भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी केली होती. त्या वेळी चिनी प्रसारमाध्यमांमध्ये याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र त्या तुलनेत रविवारी घेतलेल्या चाचणीला तेथील प्रसारमाध्यमांनी अत्यंत सौम्यपणे प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच अशी क्षेपणास्त्र क्षमता असलेल्या अवघ्या पाच देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाल्याने भारताची महासत्ता होण्याची क्षमता अधोरेखित होत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण झिनुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने नोंदविले आहे.