DRDO IADWS : भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वी स्वदेशी बनावटीची हवाई संरक्षण प्रणाली आकाश प्राईमची यशस्वी चाचणी केली होती. त्यानंतर आता संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आणखी एका स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली IADWS ची यशस्वी चाचणी केली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ओडिशामधील एका किनाऱ्याजवळ हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली अर्थात आयएडीडब्लूएसची (IADWS) चाचणी यशस्वी पार पडली आहे. मिशन सुदर्शन चक्र या मोहिमेच्या अनुषंगाने देशव्यापी स्वदेशी सुरक्षा कवच विकसित करण्याच्या पार्श्वभूमीवर भारताचं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, “आयएडीडब्लूएस (IADWS) ही एक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे. त्यामध्ये सर्व स्वदेशी क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल्स(QRSAM), अॅडव्हान्स्ड व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम (VSHORADS) क्षेपणास्त्रे आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) यांचा समावेश आहे.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना मिशन सुदर्शन चक्र सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांनीच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने आयएडीडब्लूएसची यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यामुळे ही एक व्यापक, बहुस्तरीय, नेटवर्क असलेली प्रणाली असणार आहे. ही स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली भारत आणि विविध देशांमधील शत्रूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण देण्यासाठी आहे.

दरम्यान, देशाच्या सीमा आणि लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्रे, विमाने आणि मानवरहित हवाई वाहनांसह धोके शोधण्यासाठी आणि ते धोके नष्ट करण्यासाठी पाळत ठेवणे यासाठी ही स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली अनेक स्तरांवर संरक्षण प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.