देशात करोना लसीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे सर्वात महत्वाचे शस्त्र आहे. अशा परिस्थितीत, देशात लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी, सरकारने लसीचे उत्पादन सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भारताचे कोविड -१९ लसींचे वाढते उत्पादन आणि अर्ध्याहून अधिक प्रौढ लोकसंख्येला कमीतकमी एक डोस देऊन झाल्याने पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून काही महिन्यांत देशातून पुन्हा निर्यात होऊ शकते अशी आशा करण्यात येत आहे.
रॉटर्सच्या वृत्तानुसार, जवळजवळ १०० देशांना ६६ दशलक्ष डोस दान किंवा विक्री केल्यानंतर, भारताने एप्रिलच्या मध्यावर देशांतर्गत लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्यात थांबवली होती. देशात दुसऱ्या लाटेचा कहर वाढल्याने ही निर्यात थांबवण्यात आली होती. ज्याचा फटका अनेक आफ्रिकन आणि दक्षिण आशियाई देशांच्या लसीकरण योजनेला बसला होता.
भारताच्या दैनंदिन लसीकरणाने शुक्रवारी १० दशलक्ष डोसचा टप्पा ओलांडला आहे, जो एप्रिलपासूनच्या लसींच्या उत्पादनापेक्षा दुप्पट आहे आणि येत्या आठवड्यात तो पुन्हा वाढणार आहे. कॅडिला हेल्थकेअर (CADI.NS) द्वारे विकसित केलेल्या लसीला नुकतीच मान्यता मिळाली आहे आणि रशियाच्या स्पुटनिक व्हीचे व्यावसायिक उत्पादन भारतात सुरू होत आहे. त्यामुळे नवीन उत्पादन तयार होणार आहे.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आता अॅस्ट्राझेनेका लसीचे सुमारे १५० दशलक्ष डोस तयार करत आहे, जे एप्रिलमध्ये सुमारे ६५ दशलक्ष होते. “निर्यातीसाठी कोणतीही निश्चित वेळ नाही, पण कंपनीला काही महिन्यांत पुन्हा ते सुरू होण्याची अपेक्षा आहे,” असे सूत्रांनी सांगितले.
ग्लोबल व्हॅक्सिन शेअरिंग प्लॅटफॉर्म COVAX ने भारतातून परदेशात लस विक्री लवकरात लवकर सुरू होण्याची अपेक्षा केली आहे. COVAX सोबत काम करणाऱ्या जीएव्हीआयच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला याबाबत माहिती दिली आहे. “यशस्वी राष्ट्रीय लसीकरण आणि अधिक उत्पादनाने आम्हाला आशा आहे की COVAXला भारतीय लसींचा पुरवठा लवकरात लवकर सुरू होईल,” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथील भारत बायोटेकच्या नवीन प्लांटमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुरू केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. भारत बायोटेकच्या चिरॉन बेहरिंग लस संयंत्रातून करोनाविरोधी लसीची पहिली तुकडी राष्ट्राला समर्पित करताना आरोग्य मंत्री म्हणाले की नवीन युनिटची उत्पादन क्षमता दरमहा एक कोटी आहे. या युनिटमध्ये रविवारपासून लसीचे उत्पादन सुरू झाले आहे. या प्लांटमधून सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरू होईल.
